Home >> ताज्या बातम्या >> उमर खालिदला समर्थन दिल्याचा तरुणांकडून निषेध

उमर खालिदला समर्थन दिल्याचा तरुणांकडून निषेध

आझाद मैदानात निदर्शने : आंदोलनात तरुणांचा वापर झाल्याचा आरोप


26th July, 10:59 pm
उमर खालिदला समर्थन दिल्याचा तरुणांकडून निषेध

आझाद मैदान येथे निदर्शनात सहभागी झालेले तरुण.
गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शनिवारी आझाद मैदानावर झालेल्या सभेत उमर खालिदला समर्थन देणारे फलक झळकल्याचा तरुणांनी रविवारी निषेध केला. ‘फ्री उमर खालिद’ असे फलक सभेत दाखविण्यात आल्याबद्दल आक्षेप घेऊन नीट प्रश्नपत्रिका फुटीविरोधातील आंदोलनात तरुणांचा वापर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
या सभेत विराज देसाई, श्रेयस राणे आदींनी भाषणे केली. तसेच 'वंदे मातरम्'सह विविध घोषणा देण्यात आल्या. श्रेयस राणे म्हणाले की, उमर खालिदचा हिंदू-मुस्लीम दंगलींशी संबंध असल्याचा आरोप आहे. त्या दंगलींमध्ये विद्यार्थ्यांचा बळी गेला असून तो सध्या कारागृहात आहे. अशा व्यक्तीच्या समर्थनार्थ फलक सभेत दिसणे ही गंभीर बाब आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आयोजित सभेत उमर खालिदचा मुद्दा कसा आला, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
विराज देसाई यांनी सांगितले की, नीट प्रश्नपत्रिका फुटीनंतर झालेल्या आंदोलनात अनेक आक्षेपार्ह प्रकार घडले. आंदोलनानंतर शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. मात्र, आंदोलनादरम्यान प्रभू श्रीरामांविषयीही आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या कन्येचाही सहभाग
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची कन्या पार्थवी सावंत हिनेही या निषेध सभेत सहभाग घेतला. नीट प्रश्नपत्रिका फुटीविरोधातील आंदोलनात राष्ट्रविरोधी मागण्या करणे चुकीचे असून विद्यार्थ्यांचा अशा प्रकारे वापर होऊ नये, असे ती म्हणाली. आंदोलन हे प्रश्नपत्रिका फुटीविरोधात होते आणि त्या मुद्द्यापुरतेच मर्यादित राहायला हवे, असेही पार्थवीने स्पष्ट केले.

दानिशची विविध अटींवर सुटका
म्हापसा आणि पणजी येथील नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनादरम्यान ‘फ्री उमर खालिद’चे वादग्रस्त फलक झळकावणाऱ्या दिल्लीतील मोहम्मद झान्सकार दानिश (३०, पूर्व दिल्ली) याला पणजी पोलिसांनी प्रतिबंधात्मक अटक केली. त्याला तिसवाडीचे उपजिल्हाधिकारी वसंत दाभोलकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी ५० हजार रुपयांचा बाँड आणि चार दिवस पणजी पोलीस स्थानकात हजेरी लावण्याच्या अटीवर दानिशची सुटका करण्यात आली. यावेळी त्याला ताकीदही देण्यात आली आहे.               

हेही वाचा
सर्व पहा