Home >> ताज्या बातम्या >> राजीनाम्यामुळे विद्यार्थी चळवळीला, लोकशाहीला नवी आशा!

राजीनाम्यामुळे विद्यार्थी चळवळीला, लोकशाहीला नवी आशा!

पणजीच्या आझाद मैदानावर विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th July, 09:35 pm
राजीनाम्यामुळे विद्यार्थी चळवळीला, लोकशाहीला नवी आशा!

विद्यार्थ्यांच्या मागणीला यश मिळत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर शनिवारी पणजीतील आझाद मैदानावर विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थितांनी आंदोलनाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.

विद्यार्थी चळवळीला नवी आशा

व्यवस्थेतील चुकीच्या गोष्टींना प्रश्न विचारल्यास बदल घडवून आणता येतो, हे या आंदोलनातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे देशासह गोव्यातील विद्यार्थी चळवळीला आणि लोकशाही प्रक्रियेला नवी आशा मिळाल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अमरीन शेख यांनी सांगितले.

दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ गोव्यात शांततापूर्ण आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या आंदोलनाला गोव्यातील नागरिकांनी दिलेल्या अभूतपूर्व पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार मानले. ही चळवळ भविष्यासाठी मैलाचा दगड ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करत शिक्षण व्यवस्थेत आणखी सुधारणा होण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. गोव्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठीही नागरिकांनी एकत्र येऊन लोकशाही मार्गाने आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रश्न विचारण्याची वृत्ती कायम ठेवण्याचे आवाहनशिक्षण व्यवस्थेतील बदलांसाठी सुरू झालेली चळवळ येथेच थांबता कामा नये. व्यवस्थेला प्रश्न विचारणे आणि लोकशाही मार्गाने बदल घडवून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे अमरीन शेख यांनी स्पष्ट केले.
‘फ्री उमर खालिद’ पोस्टरबाजीवरून वाद

आझाद मैदानावर आनंदोत्सव सुरू असताना दानिश नावाच्या एका तरुणाने ‘फ्री उमर खालिद’ असे लिहिलेले पोस्टर झळकवले. याबाबत विचारणा केल्यानंतर असे पोस्टर प्रदर्शित करण्याचा आपल्याला अधिकार असल्याचे त्याने सांगितले. या घटनेनंतर काही आंदोलक आणि माध्यम प्रतिनिधींमध्ये काही काळ वाद निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करून संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्या सुटकेच्या मागणीसाठी काही आंदोलकांनी रात्री उशिरापर्यंत पोलीस मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.