केंद्रीय आरोग्य खात्याचा अहवाल : पाच वर्षांत रुग्णांमध्ये सरासरी १० टक्क्यांची वाढ

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : गेल्या काही वर्षांत राज्यातील कर्करोगाच्या (कॅन्सर) रुग्णांत सातत्याने वाढ होत आहे. राज्यात २०२१ ते २०२५ या पाच वर्षांत कर्करोगाचे ८,६८७ रुग्ण आढळले होते. याचाच अर्थ महिन्याला सरासरी १४४, तर दिवसाला सरासरी ४ हून अधिक रुग्ण आढळले. पाच वर्षांत कर्करोगी रुग्णांची संख्या ९.९९ टक्क्यांनी वाढली आहे. वरील कालावधीत संपूर्ण देशात कर्करोगाचे ७५ लाखांहून अधिक रुग्ण आढळले होते. राष्ट्रीय कर्करोग नोंदणी प्रकल्पात ही आकडेवारी नोंदवण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य खात्याच्या अहवालाद्वारे ही माहिती जाहीर करण्यात आली आहे.
अहवालानुसार, गोव्यात २०२१ मध्ये कर्करोगाचे १,६५२ रुग्ण आढळले होते. २०२२ मध्ये १,७०० रुग्ण आढळले. २०२३ मध्ये १,७३५, २०२४ मध्ये १,७८३, २०२५ मध्ये रुग्णांची संख्या १,८१७ झाली. वरील कालावधीत संपूर्ण देशात कर्करोगाचे महिन्याला सरासरी १.२५ लाख, तर दिवसाला सरासरी ४,१०० रुग्ण आढळले. २०२१ च्या तुलनेत २०२५ मध्ये देशातील कर्करोगींची संख्या १०.०४ टक्क्यांनी वाढली. देशात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगालमध्ये रुग्णांची संख्या तुलनेने अधिक होती.
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण प्रकल्पाअंतर्गत केंद्रातर्फे सर्व राज्य सरकारना तांत्रिक आणि आर्थिक मदत केली जाते. यानुसार देशभरात ७७० जिल्हा रुग्णालयांना मदत दिली जात आहे. कर्करोग रुग्णांसाठी ५२४ केंद्र सुरू करण्यात आली आहेत. आयुषमान आरोग्य मंदिर योजनेअंतर्गत निरोगी आयुष्याचा पुरस्कार करण्यात येत आहे. देशभरातील जन औषधी केंद्रात विविध प्रकारची औषधे ५० ते ८० टक्के कमी दरात उपलब्ध करून दिली जात असल्याचे अहवालात म्हटले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक, तर सिक्किममध्ये सर्वांत कमी रुग्ण
२०२१ ते २०२५ या कालावधीत उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक ११ लाख कर्करोगाचे रुग्ण आढळले. यानंतर महाराष्ट्रात ६.०२ लाख, पश्चिम बंगालमध्ये ५.०९ लाख, तर बिहारमध्ये ४.९७ लाख रुग्ण आढळले होते. वरील कालावधीत सिक्किम येथे सर्वांत कमी म्हणजेच २,६३७ रुग्ण आढळले. मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघायल येथे रुग्णांची संख्या तुलनेने कमी होती. केंद्र शासित प्रदेशात लक्षद्वीप येथे सर्वांत कमी म्हणजेच १५२ रुग्ण आढळल्याचे अहवाल नमूद केले आहे.