Home >> गुन्हे >> बिटकॉइनद्वारे जास्त मोबदल्याच्या आशेपोटी गमावले ३५.५० लाख रुपये

बिटकॉइनद्वारे जास्त मोबदल्याच्या आशेपोटी गमावले ३५.५० लाख रुपये

सासष्टी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकाला अज्ञाताकडून गंडा

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
24th July, 11:57 pm
बिटकॉइनद्वारे जास्त मोबदल्याच्या आशेपोटी गमावले ३५.५० लाख रुपये

पणजी : बिटकॉइन मायनिग ट्रेडिंगमध्ये जास्त मोबदला देण्याचे आमिष दाखवून सासष्टी तालुक्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला ३५.५० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी सायबर विभागाने अज्ञात मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल केला.

सायबर गुन्हा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सासष्टी तालुक्यातील ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराला फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून ब्राईन बोन्स या व्यक्तीने संपर्क साधला. त्यानंतर मोबाईलधारकाने वॉट्सअॅपच्या माध्यमातून हिल्डा नामक महिलेने संपर्क साधला. वरील दोघांनी तक्रारदाराला जानेवारी ते एप्रिल २०२६ या कालावधीत संपर्क साधला. तक्रारदाराला वरील दोघांनी बिटकाॅईन मायनिग ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त मोबदला देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार, तक्रारदाराने संशयितांनी सांगितल्यानुसार, विविध बँक खात्यात मिळून ३५.५० लाख जमा केले. त्यानंतर तक्रारदाराला unionfrontier.com या संकेतस्थळावर भेट देण्यास सांगितले. तिथे त्याची रक्कम वाढत असल्याचे दाखविण्यात आले. त्यानंतर तक्रारदाराने जमा झालेली रक्कम काढण्यासाठी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता त्याला शुल्क म्हणून आणखी रक्कम जमा करण्यास सांगितले. त्याला संशय आल्यामुळे त्याने वरील संकेतस्थळाची चौकशी केली असता, ते बनावट असल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर विभागात तक्रार दाखल केली.

सायबर विभागाने अज्ञात वॉट्सअॅप मोबाईल धारकाविरोधात भा. न्या. सं.च्या ३१८(४), ३१९(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

हेही वाचा
सर्व पहा