मोरजीतील घटना : अटक बेकायदेशीर असल्याचा दोघांचा दावा

पणजी : मोरजी येथे वकील अॅड. अंकुर कुमार यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी दिलीप मोरजे यांची मुलगी दीपिका तारी हिला पोलिसांनी अटक केली. दरम्यान, दिलीप मोरजे आणि त्यांचा मुलगा ध्रुव मोरजे यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केलेल्या याचिकेचा निवाडा सोमवारी होणार आहे.
मोरजी पंचायत क्षेत्रातील तेमवाडा समुद्रकिनारी उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर १७ जुलै रोजी जमीनमालक अनिल प्रभाकर नाईक आणि त्यांचे वकील अॅड. अंकुर कुमार घटनास्थळी गेले असता त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मांद्रे पोलिसांनी दिलीप मोरजे, ध्रुव मोरजे यांच्यासह १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी १८ जुलै रोजी दिलीप आणि ध्रुव मोरजे यांना अटक करून दुसऱ्या दिवशी पेडणे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. त्यावेळी दोघांनी अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत विरोध केला. मात्र, न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली. याच दरम्यान त्या दोघांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणात मांद्रे पोलिसांच्या निष्काळजीपणाची दखल घेऊन प्रकरणाचा तपास दुसऱ्या पोलीस निरीक्षकांना देण्यास सांगितले होते. त्यानुसार, कोलवाळचे निरीक्षक संजित कांदोळकर यांच्याकडे वरील प्रकरण वर्ग करण्यात आले. त्या दोघांना आणखीन सात दिवस पोलीस कोठडी ठोठावली.
दरम्यान, त्या दोघांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी धाव घेऊन दोघांची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केला. या प्रकरणी शुक्रवारी न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी वरील दावा केला. याला विरोध करून सरकारी अभियोक्ता शैलेंद्र भोबे यांनी वरील दावा खोडून काढला. या प्रकरणात दाखल केलेल्या सदर कलम अंतर्गत सात वर्षांहून जास्त किंवा जन्मठेपेची शिक्षेची तरतूद असल्याचे सांगितले. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर निवाडा सोमवार २७ रोजी राखून ठेवला.
वकिलाला मारहाण प्रकरणातील तपास अधिकारी तथा कोलवाळ पोलीस निरीक्षक संजित कांदोळकर यांनी दिलीप मोरजे यांची मुलगी दीपिका तारी हिला शुक्रवारी अटक केली. तिला पोलीस कोठडीसाठी शनिवार, २५ रोजी पेडणे प्रथमवर्ग न्यायालयात उपस्थित करण्यात येणार आहे.