डॉ. लक्ष्मण यादव : विष्णू वाघ स्मृती व्याख्यानात समाज व्यवस्थेवर भाष्य

पणजी : देशातील बहुजन समाजाच्या चळवळीचा केंद्रबिंदू नेहमीच तर्क आणि समता हा राहिला आहे. नव्या पिढीला बहुजन चळवळीच्या या समृद्ध इतिहासाची जाणीव करून देणे ही आपल्या सर्वांची संयुक्त जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्यात पुस्तके अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतील, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत डॉ. लक्ष्मण यादव यांनी केले.
शुक्रवारी विष्णू सूर्या वाघ मित्रपरिवारच्या वतीने आयोजित विष्णू वाघ स्मृती व्याख्यानात ‘बहुजन राजकारण: परंपरा आणि भविष्य’ या विषयावर ते पुष्प गुंफत होते. या कार्यक्रमाला युगांक नाईक, कौस्तुभ नाईक आणि रामराव वाघ यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
आपल्या व्याख्यानात बोलताना डॉ. यादव म्हणाले, देशाच्या गेल्या काही शेकडो वर्षांच्या इतिहासात विशिष्ट घटकांनी बहुजन समाजाला आपल्या प्रभावाखाली ठेवले. समाजात जातीव्यवस्था निर्माण करून बहुजनांना सातत्याने दडपण्याचा प्रयत्न झाला. मात्र, गौतम बुद्धांपासून ते संत कबीर, बसवेश्वर, गुरू नानक, बुल्ले शाह, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत अनेक विचारवंतांनी या विषम समाजव्यवस्थेला वेळोवेळी आव्हान दिले. त्यांनी प्रथा आणि परंपरांवर रोखठोक प्रश्न उपस्थित केले. त्यांनी केलेल्या प्रदीर्घ संघर्षामुळेच आज आपल्यासारख्या घटकांसाठी सक्षम पाया तयार झाला आहे.
ते पुढे म्हणाले, या महान समाजसुधारकांच्या कार्यामुळेच आज आपण व्यासपीठावर उभे राहून बोलू शकत आहोत. आपल्या समाजात ९० टक्के जनता श्रमजीवी आहे, तर उरलेले १० टक्के लोक या श्रमजीवींच्या कष्टावर जगणारे परजीवी आहेत. दुर्दैवाने हीच व्यवस्था काळानुसार आजही सुरू आहे.
देशातील शैक्षणिक व आर्थिक परिस्थितीवर बोट ठेवताना डॉ. यादव म्हणाले, बहुजन समाजाची लोकसंख्या मोठी असूनही आज अनेक विद्यापीठांमध्ये अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) अथवा इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजातील प्राध्यापक आणि कुलगुरूंची संख्या अत्यंत नगण्य आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने सुधारत असल्याचे सांगितले जाते; परंतु असे असतानाही देशातील अब्जाधीश व श्रीमंत व्यक्तींमध्ये बहुजन समाजाचे प्रमाण का नाही, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
समाजसुधारणेची खरी सुरुवात गौतम बुद्धांपासून झाली. त्यांनी केवळ कोणीतरी सांगतो म्हणून एखादी गोष्ट आंधळेपणाने स्वीकारू नका, असा वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. कबीरांसह अन्य सुधारकांनी व्यवस्थेला प्रश्न विचारून बहुजन समाजातील मानसिक गुलामगिरी संपवण्याचे प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी प्रथम स्वतःच्या मनातील भीती दूर केली, असे त्यांनी नमूद केले.
बहुजन समाजाने उच्चवर्गीयांचे बाहुले बनू नये
शेवटी बोलताना त्यांनी, नव्या पिढीने आपल्या मनातील भीती पूर्णपणे काढून टाकली पाहिजे आणि त्यासाठी अथांग वाचन करणे आवश्यक आहे. बहुजन समाजाने उच्चवर्गीयांच्या हातातले बाहुले बनू नये. तसेच संस्कृतीच्या सपाटीकरणाला पाठिंबा न देता, नेहमी समतेच्या मूल्यांना प्राधान्य दिले पाहिजे, असे आवाहन केले.