केंद्राच्या निर्णयामुळे म्हादईबाबत निर्माण होणारी दिशाभूल आणि भीती आता संपणार : जलस्रोत मंत्री शिरोडकर

मडगाव : म्हादई नदीवरील वादग्रस्त कळसा भांडुरा प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे या प्रकरणातील दिशाभूल आणि लोकांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत होईल, असा विश्वास राज्याचे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी व्यक्त केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत कर्नाटक सरकारला या प्रकल्पाचे कोणतेही काम करता येणार नाही आणि या प्रकल्पाची वन व पर्यावरणविषयक मंजुरी प्रलंबितच राहील, असे केंद्राने स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले. मडगाव येथील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
राज्यातील पाणीटंचाईच्या संदर्भात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, यंदा पावसाचे प्रमाण दरवर्षीपेक्षा काहीसे कमी असले तरी आवश्यक तेवढा पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यात पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही. साळावली धरण सध्या ६५ ते ७० टक्के भरले असून, कुशावती नदीच्या पाण्याचा वापर सुरू करण्यात येत आहे. साळावली धरणातून सोडण्यात येणाऱ्या ७० एमएलडी पाण्यापैकी दवर्ली जलप्रकल्पापर्यंत केवळ ४० एमएलडी पाणी पोहोचत होते आणि उरलेल्या पाण्याचा अपव्यय होत होता. आता योग्य जलव्यवस्थापन करून केवळ गरजेनुसारच पाणी सोडले जात असून कुशावतीचे ३० ते ४० एमएलडी पाणी वापरल्यामुळे धरणातील तेवढ्याच प्रमाणातील पाणी वाचणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीबाबत विचारले असता, शिरोडा मतदारसंघातील जनतेचा आपल्याला पूर्ण पाठिंबा असल्याचे शिरोडकर यांनी ठामपणे सांगितले. ४० वर्षांच्या राजकीय प्रवासात अनेक युतीतील पक्ष आले आणि गेले, तरीही आपल्या जनधारावर कोणताही फरक पडलेला नाही. भाजपमध्ये तिकीट वाटपाची एक ठराविक पद्धत आणि शिस्त असते, त्या प्रक्रियेनंतरच उमेदवारी जाहीर केली जाते. शिरोड्यातून २०० टक्के भाजपच्या तिकिटावरच आपण निवडणूक लढवणार असल्याचे सांगत त्यांनी सर्व राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला.