Home >> गोवा >> पर्वरीत अग्निशमन दलाच्या ८ कर्मचाऱ्यांना डेंग्यू

पर्वरीत अग्निशमन दलाच्या ८ कर्मचाऱ्यांना डेंग्यू

टाऊन स्क्वेअर स्थळ ठरले डेंग्यूचे प्रादुर्भाव केंद्र

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
23rd July, 11:59 pm
पर्वरीत अग्निशमन दलाच्या ८ कर्मचाऱ्यांना डेंग्यू

म्हापसा : पर्वरी येथे आठ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. हे सर्व रुग्ण अग्निशमन दलाचे कर्मचारी आहेत. टाऊन स्क्वेअर प्रकल्पस्थळी सुरू असलेल्या बांधकामामुळे डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने रहिवाशांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.

मागील दोन आठवड्यांपासून पर्वरी टाऊन स्क्वेअर प्रकल्पस्थळी डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे आढळून आले आहे. डेंग्यूचे निदान झालेले सर्व आठही रुग्ण हे अग्निशमन दलाचे कर्मचारी आहेत. या सर्व डेंग्यू बाधीत कर्मचार्‍यांवर उपचार सुरू आहेत.

पर्वरी आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. सिकंदर तलवार यांनी सांगितले की, हनुमान मंदिराच्या जवळ मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू आहे. पर्वरी टाऊन स्क्वेअर प्रकल्पाचे काम ज्या बांधकाम कंपनीकडे सोपवण्यात आले आहे, त्या कंपनीला आरोग्य खात्याच्या स्वच्छतेविषयक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोनवेळा दंड ठोठावण्यात आला आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्राने दि. १० डिसेंबर २०२५ रोजी संबंधित बांधकाम कंपनीवर १ लाख रुपयांचा दंड आकारला होता. त्यानंतर ८ जून २०२६ रोजी पुन्हा एकदा सदर कंपनीवर कारवाई करत ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. डेंग्यूचा पहिला रुग्ण याच टाऊन स्क्वेअर प्रकल्पाच्या ठिकाणी आढळला होता. संबंधित बांधकाम कंपनीच्या साइट सुपरवायझरला डेंग्यूची लागण झाली होती. दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी बांधकाम कंपनीला नोटीस बजावण्यात आली होती.

आरोग्य केंद्राच्या सूचनांचे पालन न केल्यामुळे दि. ११ जुलै रोजी कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आता पर्वरी अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांना डेंग्यूची लागण झाली आहे, असे डॉ. तलवार यांनी सांगितले.

पर्वरी टाऊन स्क्वेअर प्रकल्पाच्या बाजूला तसेच गोवा क्रिकेट अकादमी आणि पंचायत ग्रंथालयाच्या बांधकाम स्थळासमोरील खाद्यपदार्थांच्या गाड्यांच्या परिसरात डासांची पैदास होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे, प्राथमिक आरोग्य केंद्राने संबंधित बांधकाम कंपनीला २३ जुलै रोजी पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे

या नोटिशीच्या प्रती पेन्हा द फ्रँका पंचायत, आरोग्य सेवा संचालनालय आणि उत्तर गोवा जिल्हाधिकारी यांनाही पाठवण्यात आली आहे. बांधकाम कंपनीने आपल्या आवारात स्वच्छता राखली नाही, तर आगामी काळात पर्वरीत डेंग्यू रुग्णांची संख्या वाढू शकते, अशी शक्यता आरोग्य केंद्राने व्यक्त केली आहे.

डेंग्यूचे रुग्ण आढळल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राने डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. साचलेल्या पाण्यात औषध फवारणी करण्यासारख्या ‘अँटी-लार्वल’ (डासांच्या अळ्या नष्ट करणे) उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दि. १८ आणि २० जुलै रोजी टाऊन स्क्वेअर प्रकल्प परिसर, पंचायत ग्रंथालय परिसर आणि गोवा क्रिकेट अकादमीच्या परिसरात धूर फवारणी करण्यात आली आहे, असे डॉ. सिकंदर तलवार यांनी सांगितले.  

हेही वाचा
सर्व पहा