
पणजी: देशातील विविध स्पर्धा परीक्षांचे पेपर लीक होणे आणि शिक्षण व्यवस्थेत निर्माण झालेला गोंधळ यामुळे युवा पिढीचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या गंभीर मुद्यावर आणि विद्यार्थ्यांच्या वाढत्या असंतोषावर केंद्र सरकारने संसदेत तातडीने सविस्तर चर्चा घडवून आणावी, अशी आग्रही मागणी 'सिटीझन्स फॉर डेमोक्रसी' (Citizens for Democracy) संघटनेने केली आहे. यासोबतच आंदोलक विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्ज आणि पोलिसी कारवाईचा संघटनेने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना सिटीझन्स फॉर डेमोक्रसीचे गोवा निमंत्रक एल्विस गोम्स यांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून झालेल्या बळप्रयोगावर गंभीर चिंता व्यक्त केली. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीने लाठीमार करण्यात आला आणि ज्या प्रकारे खाजगी व्यक्तींनी हेल्मेट घालून विद्यार्थ्यांना मारहाण केली, ते पाहता देशात संविधानाने दिलेले लोकशाही मूल्य टिकून आहेत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी घटनापीठात दिलेल्या भाषणाचा दाखला देत गोम्स म्हणाले की, लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन करणे हा सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेला मूलभूत अधिकार आहे. इंग्रजांच्या काळात आंदोलने चिरडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जुलमी पद्धती स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही वापरल्या जाणे अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे.
भारताला नालंदा विद्यापीठासारखा मोठा शैक्षणिक वारसा आहे. मात्र, आज वारंवार होणाऱ्या पेपर लीकच्या घटनांमुळे तरुण पिढी भरडली जात आहे. या प्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून सरकारने जाहीर माफी मागावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, असे गोम्स म्हणाले.
संघटनेचे सदस्य अमर गावकर यांनीही यावेळी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, देशातील तरुणांचा राग फक्त पेपर लीकपुरता मर्यादित नसून तो वाढती बेरोजगारी आणि रोजगाराच्या अभावाशी जोडलेला आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकऱ्यांची संधी उपलब्ध नाही; सरकारी नोकऱ्या कमी होत आहेत आणि खाजगी क्षेत्रात कपात सुरू आहे. यामुळे तरुणांमध्ये प्रचंड अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकसभा आणि राज्यसभा या चर्चा करण्यासाठीच बनवल्या गेल्या आहेत. बहुमताच्या जोरावर निर्णय लादण्याऐवजी सरकारने संसदेत या विषयावर खुली चर्चा करावी, अन्यथा तरुणांमधील हा असंतोष देशात अधिक मोठ्या आंदोलनाला जन्म देऊ शकतो, असा इशाराही गावकर यांनी दिला.