म्हापसा न्यायालयाचा निवाडा

म्हापसा : धारगळ येथील प्रवेश शुल्क बूथ (टोल नाका) तोडफोड आणि कर्मचार्यांना मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्राचे मंत्री आणि कणकवलीचे आमदार नीतेश राणे यांच्यासह इतरांची म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
यासंदर्भातील निवाडा न्यायाधीश पूजा सरदेसाई यांनी आज दिला. डिसेंबर २०२३ रोजी वरील प्रकरण घडले होते. पोलीस स्थानकातील नोंदीनुसार संशयित नीतेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी धारगळ येथील प्रवेश शुल्काची रक्कम देण्यास नकार देत बूथची तोडफोड करीत राडा केला होता. तसेच सरकारी कर्मचार्यांना मारहाण केली होती.
याप्रकरणी पेडणे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १४३, १४७, १४८, ३२४, ३३२, ३५३, ४५२, ४२०सह १४९ आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी नीतेश राणे, राहुल परब, मुकुंद परब, हरिश्चंद्र सावंत, राकेश परब, प्रशांत मालकर, विनम्र आचरेकर, सागर पाटील आणि संतोष राऊत यांना अटक केली होती. नंतर वरील संशयितांच्या विरोधात पोलिसांनी पेडणे न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणाची सुनावणी म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयात पूर्ण झाली.
आज गुरुवारी न्यायालयाने वरील सर्व संशयितांना निर्दोष मुक्त केले. सुनावणी वेळी न्यायालयात सरकारी अभियोक्ता तेजस पवार तर संशयितांच्या वतीने ॲड. संग्राम देसाई व अॅड. अभय चिखलीकर हे हजर होते. आपल्या सोबतच इतर सर्वांना या खटल्यातून दोषमुक्त केल्याबद्दल नीतेश राणे यांनी न्यायालयाचे आभार मानले.