Home >> गोवा >> एआयमध्ये चांगल्या दर्जाच्या कोकणी भाषांतरासाठी कोकणीत डेटा हवा : डॉ. सिंग

एआयमध्ये चांगल्या दर्जाच्या कोकणी भाषांतरासाठी कोकणीत डेटा हवा : डॉ. सिंग

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
5 hours ago
एआयमध्ये चांगल्या दर्जाच्या कोकणी भाषांतरासाठी कोकणीत डेटा हवा : डॉ. सिंग

पणजी : बहुभाषिक एआय अथवा गुगल ट्रान्सलेट मध्ये चांगल्या दर्जाचे कोकणी भाषांतर (AI, Google Translate in Konkani language) हवे असेल तर बहुभाषिक एआयला आपणच प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. यासाठी ऑनलाईन जगतात अधिकाधिक कोकणी भाषेतील डेटा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे मत डॉ. उदय नारायण सिंग यांनी व्यक्त केले.

गुरुवारी पणजीत खांडोळा सरकारी महाविद्यालयातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भूषण सावईकर, बालाजी शेणवी, डॉ. पूर्णकला सामंत, आशा गेहलोत व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. सिंग यांनी सांगितले की, बहुभाषिक एआय अथवा गुगल ट्रान्स्लेटद्वारे हिंदी किंवा मराठी भाषांतर सुलभपणे उपलब्ध होते. मात्र कोकणी भाषांतर तितके योग्य नसते. कोकणी भाषांतरात अनेक मराठी शब्द आढळतात.

ऑनलाईन जगतात कोकणी पेक्षा मराठी हिंदी शब्द अधिक असल्याने असे होते. यासाठी अशा प्लॅटफॉर्मना आपणच नियंत्रणात ठेवले पाहिजे. जास्तीत जास्त कोकणी शब्द, डेटा, वाक्य, साहित्य ऑनलाईन क्षेत्रात उपलब्ध करावे. यामुळे भाषांतर करणाऱ्या प्लॅटफॉर्मना पुरेसा कोकणी शब्द संग्रह, डेटा मिळेल. असे झाल्यास आत्ताच्या तुलनेत कोकणी भाषांतर अधिक सुलभपणे होऊ शकते. 

ते म्हणाले, भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये २२ भाषांना मान्यता मिळालेली असली, तरी भाषांतरासाठी मिळणारा सरकारी निधी समान प्रमाणात दिला जात नाही. हिंदीसारख्या भाषांना मोठे संस्थात्मक पाठबळ आणि प्रचंड मोठी बाजारपेठ लाभली आहे.

तर दुसरीकडे कोकणीसारख्या प्रादेशिक भाषांना आवश्यक निधीच्या अभावाचा सामना करावा लागतो. मल्याळम भाषेतील भाषांतराची व्यवस्था अत्यंत तत्पर आहे. जागतिक स्तरावर एखाद्या पुस्तकाला नोबेल किंवा बुकर पुरस्कार मिळाला की काही दिवसांतच त्याचे मल्याळम भाषांतर वाचकांसाठी उपलब्ध होते. 

अशी तत्परता कोकणीसह अन्य प्रादेशिक भाषेत देखील आली पाहिजे. जर देशातील प्रादेशिक भाषा समूहांनी वेगाने पावले उचलली नाहीत तर कोकणीसारख्या भाषा हिंदी, मराठी आणि मल्याळमसारख्या भाषा परिसंस्थांच्या तुलनेत मागे पडण्याचा धोका आहे.

स्थानिक संस्थांनी पुढाकार घेऊन कोकणी, मराठी, हिंदी आणि संस्कृत भाषांवर लक्ष केंद्रीत करणारे विशेष भाषांतर केंद्र सुरू केले पाहिजे, जेणेकरून प्रादेशिक वाचकांना समृद्ध साहित्य उपलब्ध होईल आणि सांस्कृतिक वारशाचे जतन होईल असे सिंग यांनी सांगितले.


हेही वाचा
सर्व पहा