मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : वाढदिनी डॉ. शेट्ये यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

डिचोली : आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी आमदारकीच्या काळात सरकार समोर मांडलेल्या सर्व विकासाच्या प्रस्तावांना सरकारने सकारात्मक सहकार्य देत आज डिचोलीचा सर्वांगीण विकास साधलेला आहे. या विकासाच्या जोरावर येणाऱ्या काळातही डिचोली मतदारसंघातील जनता आमदार डॉ. शेट्ये यांनाच डिचोलीची सेवा करण्याची संधी देणार, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोली येथे व्यक्त केला.
डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. येथील हिराबाई झांट्ये सभागृहात झालेल्या या सोहळ्यास व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार प्रेमेंद्र शेट, राजेश फळदेसाई, प्रवीण अार्लेकर, संकल्प अमोणकर, माजी खासदार विनय तेंडुलकर, भाजप उत्तर जिल्हाध्यक्ष दयानंद कारबोटकर, वल्लभ सरकार व इतरांची उपस्थिती होती.
डॉ. चंद्रकांत शेट्ये हे एक अभ्यासू व कार्यतत्पर असेच आमदार असून डिचोलीच्या विकासाचा ध्यास घेत त्यांनी आजपर्यंत सरकारकडे सादर केलेल्या विकास कामांचा प्रभावी पाठपुरावा करून ही कामे पूर्णत्वासही नेली, असे मंत्री रोहन खंवटे यांनी म्हटले.
डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी मतदारसंघात गेली पाच वर्षे केलेले कार्य व त्यांना मिळत असलेला पाठिंबा पाहता येणाऱ्या काळातही त्यांना या निवडणुकीत लोक संधी देतील, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी व्यक्त केला.
एक अभ्यासू व कार्यतत्पर आमदार डिचोली मतदारसंघाने निवडून दिला असल्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी म्हटले.
यावेळी आमदार प्रेमेंद्र शेट, प्रवीण आर्लेकर, माजी खासदार विनय तेंडुलकर यांनीही विचार मांडत आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांना शुभेच्छा दिल्या.
लोकसेवेतच खरे समाधान : आमदार शेट्ये
वयाची पन्नास वर्षे उलटण्यापूर्वी आपण राजकारणात नव्हतो, पण त्यानंतर राजकारणात आलो व राजकीयदृष्ट्या वाढदिवस साजरे होऊ लागले. राजकारणात येण्यापूर्वी कधीच कोणाकडून काहीच टीका आपल्यावर करून घेतली नव्हती. पण राजकारणात आल्यानंतर अनेक टीका सहन कराव्या लागल्या. मतदारसंघाचे काम पूर्ण जबाबदारीने करत असताना लोकांची होत असलेली सेवा आपणास जास्त समाधान देते, असे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी म्हटले.