Home >> गोवा >> १ ऑगस्टपासून एआय कॅमेऱ्यांवरून तालांव

१ ऑगस्टपासून एआय कॅमेऱ्यांवरून तालांव

सुरुवातीला ठराविक नियमांसाठी देणार तालांव

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
१ ऑगस्टपासून एआय कॅमेऱ्यांवरून तालांव

पणजी : गोव्यात २६ ठिकाणी बसवलेल्या एआय कॅमेऱ्यांवरून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना १ ऑगस्टपासून तालांव (चलन) जारी होण्यास सुरूवात होणार आहे. सुरूवातीला सर्व नियमांसाठी नव्हे तर थोड्याच आणि ठराविक नियमांसाठी तालांव जारी करण्यात येणार आहे. तसेच तालांवाची रक्कम कमीतकमी असणार, असे वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी सांगितले. 

सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने केलेल्या शिफारशीप्रमाणे वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी एआय कॅमेरे बसवले आहे. तालांव देणे हा एआय कॅमेरे बसवण्याचा हेतू नाही. वाहतूक नियम पाळण्याविषयी जागृती करणे, हा मुख्य हेतू आहे. सध्या तरी जागृतीवर भर आहे, असे मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी सांगितले. वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना १५ जुलैपासून तालांव देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. नियम मोडणाऱ्या हजारो वाहन चालकांची नोंद कॅमेऱ्यांत होते. मात्र, सध्या तरी तालांव देण्यात आलेले नाहीत.  

गोव्यात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अपघातासहीत अपघातांत मृत्यू येणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. हॅल्मेट घालण्यासहीत वाहतूक नियम पाळावेत म्हणून सरकारचा प्रयत्न सुरू आहे. 

सर्व ठिकाणी वाहतूक व्यवस्थापनासाठी वाहतूक पोलीस ठेवणे शक्य नसल्याने एआय कॅमेरे बसवण्याचा निर्णय सरकारने घेतला. पहिल्या पातळीवर ९२ ठिकाणी एआय कॅमेरे बसवण्याचा निर्णय झाला. सध्या २६ ठिकाणी एआय कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हेल्मेट न घातल्यास, सीटबेल्ट न घातल्यास, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे यांची नोंद एआय कॅमेरावर व्हायला लागली आहे.

हेही वाचा
सर्व पहा