Home >> गोवा >> भाऊसाहेब बांदोडकर ते जेनिफर मोन्सेरात... नेत्यांच्या मृत्यूचे एक दुर्दैवी शुक्लकाष्ठ

भाऊसाहेब बांदोडकर ते जेनिफर मोन्सेरात... नेत्यांच्या मृत्यूचे एक दुर्दैवी शुक्लकाष्ठ

गोव्याने गमावले आमदार, मंत्रीपदी असणारे उमदे नेते

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21st July, 11:39 pm
भाऊसाहेब बांदोडकर ते जेनिफर मोन्सेरात... नेत्यांच्या मृत्यूचे एक दुर्दैवी शुक्लकाष्ठ

पणजी : कृषीमंत्री रवी नाईक (Ravi Naik) यांच्यानंतर आता ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात (Jennifer Monserrate) यांचे आमदार असतानाच निधन झाले आहे. या घटनेमुळे गोव्याच्या राजकीय वर्तुळात तीव्र शोककळा पसरली. पदावर असतानाच लोकप्रतिनिधींचे निधन होण्याच्या दुर्दैवी मालिकेची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली आहे.

यापूर्वी पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर (Bhausaheb Bandodkar), पाळी (आताचा साखळी) मतदारसंघाचे माजी आमदार गुरुदास गावस (Gurudas Gawas), माजी मंत्री माथानी साल्ढाणा (Mathany Saldanha), फ्रान्सिस डिसोझा (Fransis D'souza) आणि मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे निधन झाले होते. विष्णू वाघ (Vishnu Wagh) आमदार असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते आजारी पडले, मात्र निधन झाले तेव्हा ते आमदार नव्हते. तसेच पांडुरंग मडकईकर मंत्री असताना गंभीर आजारी पडले.

मुख्यमंत्री असताना दोन नेत्यांचे निधन

मुख्यमंत्री असताना दोन मान्यवरांचे निधन झाले. पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर (मगो) यांची प्राणज्योत १२ ऑगस्ट १९७३ रोजी मावळली. त्या वेळी ते मांद्रेचे आमदार होते. त्यानंतर पोटनिवडणूक होऊन ॲड. रमाकांत खलप आमदार म्हणून निवडून आले. मनोहर पर्रीकर यांचेही मुख्यमंत्री असतानाच १७ मार्च २०१९ रोजी निधन झाले. ते पणजीचे आमदार होते.

भाजपचे सर्वाधिक नुकसान

अलीकडच्या काळात ज्यांचे निधन झाले, त्यांपैकी बहुतांश भाजपचे आमदार होते. माथानी साल्ढाणा, फ्रान्सिस डिसोझा, कृषीमंत्री रवी नाईक आणि आता जेनिफर मोन्सेरात हे सर्व भाजपचे आमदार होते.

गुरुदास गावस (पाळी मतदारसंघ) हे काँग्रेसचे आमदार असतानाच त्यांचे निधन झाले. आमदार असताना निधन झालेले गुरुदास गावस हे एकमेव काँग्रेस आमदार आहेत. ४ जून २००८ रोजी गंभीर आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. २०१२ च्या निवडणुकीनंतर मंत्री असलेले माथानी साल्ढाणा (कुठ्ठाळीचे आमदार) यांचे निधन झाले. २१ मार्च २०१२ रोजी त्यांचे निधन झाले.

आजारपण आणि अपूर्ण कार्यकाळ...

विष्णू वाघ (सांत आंद्रे) यांना आमदार असतानाच हृदयविकाराचा झटका आला होता. पांडुरंग मडकईकर (कुंभारजुवे) अद्याप आजारी आहेत, मात्र आजारपणामुळे त्यांचे मंत्रिपद गेले. त्यांना स्ट्रोक (पक्षाघात) आला तेव्हा ते वीजमंत्री होते. तसेच पुढील निवडणूक लढवणेही त्यांना शक्य झाले नाही. आजारपणामुळे २०१७ ची निवडणूक विष्णू वाघ यांना लढवणे शक्य झाले नाही. ८ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांचे निधन झाले. २०१२ ते २०१७ या काळात ते आमदार होते.

आजारपणामुळे म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांचे मंत्रिपद गेले. आमदार असतानाच १४ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांचे निधन झाले. मनोहर पर्रीकर यांचे मुख्यमंत्री असताना १७ मार्च २०१९ रोजी निधन झाले. त्यानंतर कृषीमंत्री असलेले रवी नाईक (फोंड्याचे आमदार) यांचे १५ ऑक्टोबर २०२५ रोजी, तर आमदार जेनिफर मोन्सेरात यांचे १९ जुलै २०२६ रोजी निधन झाले.

मंत्री/आमदार असताना निधन झालेल्या व्यक्ती

- दयानंद बांदोडकर (मुख्यमंत्री, मगोप)

- गुरुदास गावस (आमदार, काँग्रेस)

- माथानी साल्ढाणा (मंत्री, भाजप)

- फ्रान्सिस डिसोझा (आमदार, भाजप)

- मनोहर पर्रीकर (मुख्यमंत्री, भाजप)

- रवी नाईक (मंत्री, भाजप)

- जेनिफर मोन्सेरात (आमदार, भाजप)