
पेडणे : तेमवाडा मोरजी येथील स्थानिक भूमिपुत्र मच्छीमार व्यावसायिकांची पिढ्यान्पिढ्या असलेली पारंपरिक घरे वाचवावीत, अन्यथा स्थानिकांना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा स्थानिक मच्छीमार व्यावसायिकांसह विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींनी आयोजित बैठकीत दिला.
स्थानिक मच्छीमारांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, अनेक दशकांपासून या परिसरात वास्तव्यास असलेल्या भूमिपुत्रांच्या घरांवर कारवाईची टांगती तलवार असल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घरे केवळ निवासस्थाने नसून मच्छीमार समाजाच्या परंपरा, संस्कृती आणि उपजीविकेचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे प्रशासनाने मानवी दृष्टिकोनातून या प्रश्नाचा विचार करून स्थानिकांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी काँग्रेसचे नेते बाबी बागकर, गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कलंगुटकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर, सामाजिक कार्यकर्ते मयूर शेटगावकर तसेच स्थानिक मच्छीमार व्यावसायिक उपस्थित होते.
उपस्थितांनी सांगितले की, भूमिपुत्रांच्या पारंपरिक घरांवर कारवाई होत असताना इतर अनेक ठिकाणी उभारण्यात आलेल्या मोठ्या प्रकल्पांकडे दुर्लक्ष होत होत आहे. कायद्याची अंमलबजावणी करताना सर्वांसाठी समान निकष लागू व्हावेत, अशी मागणी त्यांनी केली.
स्थानिक मच्छीमारांनी स्पष्ट केले की, त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह पूर्णपणे मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहे. घरे पाडल्यास अनेक कुटुंबे बेघर होतील आणि त्यांच्यासमोर उपजीविकेचाही गंभीर प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही कठोर कारवाई करण्यापूर्वी स्थानिकांशी चर्चा करून योग्य तो तोडगा काढावा.
बैठकीत उपस्थित नेत्यांनी शासनाला आवाहन केले की, तेमवाडा, मोरजी येथील भूमिपुत्र मच्छीमारांना न्याय देऊन त्यांच्या पारंपरिक घरांचे संरक्षण करावे. अन्यथा स्थानिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
या प्रश्नामुळे तेमवाडा परिसरात चिंतेचे वातावरण असून, प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते याकडे स्थानिकांसह संपूर्ण मांद्रे मतदारसंघाचे लक्ष लागून आहे.
सरकारने हस्तक्षेप करून न्याय द्यावा!
स्थानिक मच्छीमार विनोद पेडणेकर यांनी सांगितले की, अनेक पिढ्यांपासून उभी असलेली पारंपरिक मच्छीमारांची घरे आज सीआरझेड कारवाईच्या विळख्यात सापडली आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि स्थानिक आमदार जीत आरोलकर यांनी तातडीने हस्तक्षेप घालून येथील सर्व मच्छीमार कुटुंबांच्या घरांना संरक्षण द्यावे.
काँग्रेसचे नेते बाबी बागकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर,
सामाजिक कार्यकर्ते मयूर शेटगावकर, पंच सदस्य मुकेश गडेकर यांनीही मच्छीमार बांधवांना न्याय द्यावा, अशी मागणी केली
तेमवाडा मुर्जी किनारी भागात आयोजित केलेल्या बैठकीला पंच स्वप्नील शेटगावकर, माजी पंच प्रकाश शिरोडकर, नागरिक, मच्छिमार बांधव उपस्थित होते.
घरे पाडण्याची प्रक्रिया दुर्दैवी : कलंगुटकर
स्थानिक मच्छीमारांची घरे पाडण्याची प्रक्रिया अत्यंत दुर्दैवी आहे. भर पावसात घरे पाडली गेल्यास ही कुटुंबे बेघर होतील, त्यांचे संसार उघड्यावर येतील. सरकारने कायदेशीर मार्गाचा अवलंब करून न्यायालयात योग्य अर्ज दाखल करावा आणि स्थानिकांना न्याय मिळवून द्यावा. अन्यथा आम्हालाही स्थानिकांसोबत रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कलंगुटकर यांनी दिला.