Home >> गुन्हे >> स्काॅर्पिओने मागून धडक दिल्याने ‘आय २०’ कार उसळून पडली बोलेरोवर

स्काॅर्पिओने मागून धडक दिल्याने ‘आय २०’ कार उसळून पडली बोलेरोवर

बांबोळीतील फ्लायओव्हरवर विचित्र अपघात : कर्नाटकातील स्कॉर्पिओ चालक पोलिसांच्या ताब्यात

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
19th July, 11:41 pm
स्काॅर्पिओने मागून धडक दिल्याने ‘आय २०’ कार उसळून पडली बोलेरोवर

पणजी : बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) इस्पितळासमोरील फ्लायओव्हरवर रविवारी चार वाहनांची एकमेकांना जोरदार धडक बसून एक भीषण व विचित्र अपघात घडला. या अपघातात एक आय-२० कार हवेत उसळून थेट दुसऱ्या कारच्या छतावर उलटली. या भीषण साखळी अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. याप्रकरणी आगशी पोलिसांनी एका चालकाला ताब्यात घेतले आहे.
आगशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील चारही वाहने आगशीहून पणजीच्या दिशेने जात होती. फ्लायओव्हरवर पोहोचल्यानंतर ह्युंदई आय-२० कारचे चालक अनुप गोवेकर (रा. पर्वरी) यांनी अचानक आपली लेन बदलली. याच वेळी पाठीमागून येणाऱ्या कर्नाटकातील महिंद्रा स्कॉर्पिओ कार चालकाला पुढच्या वाहनाचा अंदाज न आल्याने त्याने आय-२० कारला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, आय-२० कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार डाव्या बाजूच्या सुरक्षा कठड्याला धडकून बाजूने जाणाऱ्या महिंद्रा केयुव्ही कारच्या छतावर जाऊन उलटली.
आय-२० कारला धडक दिल्यानंतर नियंत्रण सुटलेली स्कॉर्पिओ कार रस्त्यावर घसरत पुढे गेली आणि तिने पुढे चाललेल्या रेनॉल्ट क्विड या कारलाही पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आय-२० चे चालक अनुप गोवेकर हे किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने गोमेकॉत दाखल करण्यात आले, मात्र मोठी दुखापत झाली नसल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आगशी पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उदय पालकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी स्कॉर्पिओ चालकाला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय चाचणी केली असून गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
पणजीत भरधाव कारची स्कूटरला धडक
पणजी येथील कदंब बसस्थानकासमोरील आंबेडकर उद्यान परिसरात रविवारी सकाळी दुसरा भीषण अपघात घडला. मध्यप्रदेश पासिंगच्या एका भरधाव कारने स्कूटरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, स्कूटरला उडवल्यानंतर कार थेट आंबेडकर उद्यान परिसराचे कुंपण तोडून आत घुसली. या अपघातात स्कूटर चालक किरकोळ जखमी झाला असून, त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पणजी पोलिसांनी कार चालवणाऱ्या महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे                              

हेही वाचा
सर्व पहा