Home >> गुन्हे >> अली कलंदर खान हत्याप्रकरण: फरार सरताज आणि रिझवान यांना पोलिसांनी केली अटक

अली कलंदर खान हत्याप्रकरण: फरार सरताज आणि रिझवान यांना पोलिसांनी केली अटक

वर्चस्वाच्या वादातून मडगाव घोगळ येथील सुन्नी गुलिस्तान मशि‍दीच्या आवारातच चाकू खुपसून झाली होती उपाध्यक्ष खान यांची हत्या.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
अली कलंदर खान हत्याप्रकरण: फरार सरताज आणि रिझवान यांना पोलिसांनी केली अटक

मडगाव: घोगळ येथील सुन्नी गुलिस्तान मशिदीचे उपाध्यक्ष अली कलंदर खान यांच्या खून प्रकरणातील फरार संशयित सरताज मकानदार आणि रिझवान सय्यद या दोघांना फातोर्डा पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या संशयितांना जेरबंद करण्यात अखेर पोलिसांना यश आले.

ही घटना ३० जानेवारी २०२६ रोजी घडली होती. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीच्या आवारातच अली कलंदर खान यांच्या पोटात चाकू खुपसून त्यांची हत्या करण्यात आली होती. मशीद समितीवरील वर्चस्वाच्या वादातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने, जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही दिवस सुन्नी गुलिस्तान मशीद बंद ठेवली होती.

फातोर्डा पोलिसांनी या खून प्रकरणात आतापर्यंत अनेक संशयितांना अटक केली आहे. मुख्य सूत्रधार अक्रम खान याच्यासह आलम सय्यद, लतीफ सय्यद, उबेद्दुला मकंदर, सक्रुद्दिन शेख, हुसेन खान, निजामुद्दीन सय्यद आणि साहिल कन्वी उर्फ स्पाकी यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आणखी एक फरार संशयित अल्ताफ शाह सय्यद हा गुन्ह्यानंतर दुबईला पळून गेला होता. मात्र, लुकआऊट नोटीसच्या आधारे त्याला बंगळुरू विमानतळावर उतरताच ताब्यात घेण्यात आले होते. मुख्य संशयित अक्रम खान आणि साहिल कन्वी हे दोघे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, तर इतर काही संशयितांना जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणातील सर्व संशयितांवर खून आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या खून प्रकरणातील संशयित सरताज मकानदार हा न्यायालयात शरण आला होता; त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, दुसरा संशयित रिझवान सय्यद याला शुक्रवारी अटक करण्यात आली.

हेही वाचा
सर्व पहा