बागा येथील स्पाचा भागीदार अदवेश रायला अटक

म्हापसा : नोकरीचे आमिष दाखवून उत्तर प्रदेश मधील एका २३ वर्षीय युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी बागा येथील एका स्पाचा भागीदार संशयित आरोपी अदवेश राय (रा. मूळ उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे.
सुरुवातीला पीडितेने कळंगुट पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. परंतु पोलिसांनी अधिकृत निवेदन जारी करून हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत आणि गुन्हा दाखल करून संशयित आरोपीला तत्काळ अटक केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
हा बलात्काराचा प्रकार दि. १० ते ११ जुलै दरम्यान घडला होता. संशयित आरोपी राय याने पीडित युवतीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून गोव्यात बोलावून घेतले. दि. १० रोजी ती गोव्यात आल्यावर संशयित अदवेश राय याने तिला एका हॉटेलच्या खोलीत डांबून ठेवले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दि. ११ रोजी तिने कळंगुट पोलीस स्थानक गाठले व तक्रार केली.
त्यानुसार पोलिसांनी १२ रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६, १२७(२), ६४ व ३५१(३) अंतर्गत गुन्हेगारी विश्वासघात, बेकायदेशीररीत्या डांबून ठेवणे, बलात्कार आणि गंभीर परिणामाची धमकी या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. तसेच १३ रोजी, संशयिताला अटक केली. म्हापसा न्यायालयाने संशयिताला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी आरोप फेटाळले
दरम्यान, पीडितेने सुरुवातीला कळंगुट पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला, तक्रार मागे घेण्याचा सल्ला दिला आणि तिला १० हजार रुपये व विमानाचे तिकीट देऊन गोव्याबाहेर पाठविल्याचा आरोप केला होता. मात्र, कळंगुट पोलिसांनी अधिकृत निवेदनाद्वारे हे सर्व आरोप फेटाळून लावत, तक्रार प्राप्त होताच कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तत्काळ कारवाई करण्यात आली असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच पीडितेने केलेले आरोप खोटे, चुकीचे आणि तथ्यहीन असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.