Home >> गुन्हे >> बनावट ‘कुकू टीव्ही’ अ‍ॅप डाऊनलोड केलेल्या वृद्धाची १.९६ लाखांची फसवणूक

बनावट ‘कुकू टीव्ही’ अ‍ॅप डाऊनलोड केलेल्या वृद्धाची १.९६ लाखांची फसवणूक

ऑनलाईन बँक खात्यातून रक्कम लंपास; मडगाव पोलिसांत गुन्हा दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
44 mins ago
बनावट ‘कुकू टीव्ही’ अ‍ॅप डाऊनलोड केलेल्या वृद्धाची १.९६ लाखांची फसवणूक

मडगाव : मोबाईलवर अनोळखी अ‍ॅप्स डाऊनलोड केल्याने हर्कुलस रिबेलो यांची आर्थिक फसवणूक झाली आहे. ‘कुकू टीव्ही’ नावाचे बनावट एपीके अ‍ॅप डाऊनलोड करण्याच्या नादात एका ५५ वर्षीय व्यक्तीला सायबर चोरट्यांनी १ लाख ९६ हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी मडगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० मे रोजी घडली. तक्रारदार रिबेलो हे आपल्या मोबाईलवर इंटरनेट स्क्रोलिंग करत असताना त्यांना ‘कुकू टीव्ही’ या अ‍ॅपची एपीके फाईल दिसली. त्यांनी त्यावर क्लिक करताच अ‍ॅप डाऊनलोड होऊ लागले. काहीतरी गडबड असल्याचा संशय आल्याने त्यांनी डाऊनलोडिंग थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत विलंब झाला होता.
सदर बनावट अ‍ॅप डाऊनलोड होताच रिबेलो यांचा मोबाईल पूर्णपणे हँग झाला. स्क्रीनवर ताबा मिळवताच सायबर चोराने रिबेलो यांच्या ऑनलाईन बँकिंग अ‍ॅपचा वापर करून त्यांच्या खात्यातून १ लाख ९६ हजार रुपये लंपास केले. पुरावा नष्ट करण्यासाठी सायबर चोरट्याने पैसे चोरी केल्यानंतर डाऊनलोड झालेली ती एपीके फाईलही मोबाईलमधून डिलीट केली.
या फसवणुकीप्रकरणी मडगाव पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर गावकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा