मायणा-कुडतरी पोलिसांत अनैसर्गिक मृत्यूची नोंद

मडगाव : आगशे-कुडतरी येथे दीर्घकाळ गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. कोसेसाव पेस असे मृताचे नाव असून, मायणा-कुडतरी पोलिसांनी या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोसेसाव पेस हे गेल्या काही महिन्यांपासून गंभीर हृदयविकाराने त्रस्त होते. त्यातच काही दिवसांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटकाही आला होता. प्रकृती सतत खालावत असल्याने ते मानसिकदृष्ट्याही खचले होते, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
रविवारी राहत्या घरात त्यांनी दरवाजाच्या चौकटीला नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. कुटुंबीयांच्या लक्षात हा प्रकार येताच तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठविला.
प्राथमिक तपासात कोणताही संशयास्पद प्रकार आढळून आलेला नसून, दीर्घकालीन आजारपणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, सर्व बाबींची सखोल पडताळणी केली जात असून तपास पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
मायणा-कुडतरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नारायण पिंगे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.