'एक राष्ट्र, एक निवडणूक' संयुक्त समितीकडून स्पष्ट

गोवन वार्ता। न्यूज डेस्क
पणजी : संविधान (१२९वी दुरुस्ती) विधेयक, २०२४ आणि केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) विधेयक, २०२४ वरील संयुक्त समितीने एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या शक्यतांचा अभ्यास करताना शनिवारी सांगितले की, गोव्यात झालेल्या दोन दिवसीय विचारविनिमयामध्ये प्रस्तावित ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ आराखड्यासाठी उत्तम पाठिंबा मिळाला. निवडणूक प्रणाली मजबूत करण्यासाठी प्रक्रियात्मक सुरक्षा उपायांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.
या विषयावरील बैठका संपल्यानंतर पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष पी. पी. चौधरी म्हणाले की, आमदार, सरकारी अधिकारी, उद्योग प्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, नागरी सामाजिक संघटना आणि प्रसारमाध्यमे यांच्याशी झालेल्या संवादातून सकारात्मक अभिप्राय मिळाले. यामुळे समितीला, संसदेत अहवाल सादर करण्यापूर्वी शिफारशींमध्ये सुधारणा करण्यास मदत होईल. दरवर्षी वेगवेगळ्या राज्यांत विधानसभा निवडणुका होतात. त्यामुळे प्रशासन, शिक्षण, आर्थिक घडामोडी आणि सार्वजनिक खर्च यात वारंवार व्यत्यय येतो. गोव्यासारख्या, पर्यटनावर अवलंबून असलेल्या राज्यांसाठी निवडणुका पर्यटनाच्या हंगामात येतात, तेव्हा मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. तर निवडणुकांदरम्यान होणाऱ्या कामगारांच्या स्थलांतरामुळे उद्योगांनाही उत्पादनात फटका बसतो. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्यास अंदाजे सात लाख कोटी रुपयांची बचत होऊ शकते.
समितीने आतापर्यंत महाराष्ट्र, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, गुजरात आणि गोवा या राज्यांमध्ये सल्लामसलत केली असून, यापुढील फेरीत देशभरातील सर्व संबंधितांपर्यंत पोहोचून त्यांच्याशी संवाद साधण्याचे काम सुरू राहणार आहे.
निवडणुकांचे वेळापत्रक सुसंगत करणे हाच उद्देश
एकाच वेळी निवडणुका घेतल्याने संघराज्य व्यवस्था कमकुवत होईल किंवा प्रादेशिक पक्षांचे नुकसान होईल, यासारख्या चिंता फेटाळून लावत, केंद्र आणि राज्ये यांच्यातील घटनात्मक अधिकार विभागणीत कोणताही बदल करण्याचा यामागे हेतू नसून, केवळ निवडणुकांचे वेळापत्रक सुसंगत करणे एवढाच या प्रस्तावाचा उद्देश असल्याचे चौधरी यांनी सांगितले. निवडणुका एकाच वेळी घेतल्या गेल्या तरीही संसद आणि विधानसभांसाठी स्वतंत्र निर्णय घेण्यास मतदार सक्षम असल्याचे भारताच्या निवडणुकीच्या इतिहासातून दिसून येते असेही त्यांनी पुढे नमूद केले.