पर्वरीत रस्त्यावर कार पार्किंगमुळे अपघाताची शक्यता

वाहतुकीला अडथळा ठरत असलेल्या, रस्त्यावर उभ्या करून ठेवलेल्या कार.
गोवन वार्ता
पर्वरी : पर्वरीतील उड्डाण पुलाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. मात्र काहींनी रस्ते अडविण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे. येथील एका कार शोरूम समोरील रस्त्यावर कायदा धाब्यावर बसवून कार पार्क केल्या जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी इतर वाहनांना अडथळा निर्माण होतो.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच रस्त्यावरून सरकारी अधिकारी, मंत्री, आमदार आणि पोलिसांची ये-जा सुरू असते. मात्र कोणीही या धोकादायक पार्किंगकडे लक्ष देत नाही. अनेक वेळा रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या अडवून या ठिकाणी कार बाहेर काढण्याचे प्रकार सुरू असतात. उड्डाण पुलाच्या खांबांमुळे रस्ता अरुंद बनला आहे. अशा स्थितीत रस्त्यावर ओळीने कार पार्क करणे अपघातांना निमंत्रण देणारे ठरले आहे. एरवी ‘नो पार्किंग’चे निमित्त सांगून इतर ठिकाणी कारचालकांना ‘तालांव’ देणारे वाहतूक पोलीस इथे का लक्ष देत नाहीत ? असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. याच शोरूमसमोरील दुसऱ्या लेनमध्ये तर मोठ्या प्रमाणात कार पार्क केलेल्या दिसून येतात.
हाच प्रकार सुकूरमधील जुना बाजार-तिस्क येथे दिसून येतो. मालवाहू वाहने, बसेस आणि इतर खासगी वाहने या भागात महामार्गावर उभी केली जातात. इथेही कोणी लक्ष दिलेले नाही. ‘मॉल दे गोवा’समोर तर भर रस्त्यावर वाहने उभी करून काही जण खरेदीसाठी जातात. त्यामुळे वाहतूक मंदावते.
रस्ता लोकांसाठी, शोरूममधील गाड्यांसाठी नव्हे!
महामार्ग प्राधिकरण, वाहतूक पोलीस आणि आरटीओने महामार्गावरील या बेकायदा पार्किंगकडे लक्ष दिले पाहिजे. हा महामार्ग लोकांसाठी आहे. कारच्या शोरूममधील गाड्या पार्क करण्यासाठी नाही. रस्त्याचा वापर खासगी मालमत्ता असल्यासारखा होता नये.