Home >> क्रीडा >> मिकेल मेरिनोचा निर्णायक गोल; स्पेन उपांत्य फेरीत

मिकेल मेरिनोचा निर्णायक गोल; स्पेन उपांत्य फेरीत

फिफा फुटबॉल विश्वचषक : गोलरक्षक लामेन्सची चूक बेल्जियमला महागात

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
6 hours ago
मिकेल मेरिनोचा निर्णायक गोल; स्पेन उपांत्य फेरीत

लॉस एंजिल्स : जागतिक फुटबॉल विश्वाचे लक्ष वेधून घेणाऱ्या फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ स्पर्धेत २०१० चा जगज्जेता स्पेनने आपला दबदबा कायम राखत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. शुक्रवारी रात्री लॉस एंजिल्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या थरारक उपांत्यपूर्व लढतीत स्पेनने बेल्जियमचा २-१ अशा फरकाने पराभव केला. बेल्जियमचा राखीव गोलरक्षक सेने लामेन्स याच्याकडून मोक्याच्या क्षणी झालेली एक गंभीर चूक बेल्जियमला चांगलीच महागात पडली, ज्याचा पुरेपूर फायदा उठवत स्पेनने विजय निश्चित केला. आता उपांत्य फेरीत स्पेनचा सामना युरोपमधील बलाढ्य फ्रान्सविरुद्ध होणार असून, हा हाय-व्होल्टेज सामना १४ जुलै रोजी रात्री १२.३० वाजता (भारतीय वेळेनुसार १५ जुलै रोजी पहाटे) खेळवला जाईल.
स्पेन आणि बेल्जियम यांच्यातील हा सामना अत्यंत अटीतटीचा आणि शारीरिक क्षमतेचा कस पाहणारा ठरला. दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्र घेतला होता. सामन्याच्या ८७ मिनिटांपर्यंत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत होते आणि सामना अतिरिक्त वेळेत जाणार असे वाटत होते. मात्र, ८८ व्या मिनिटाला स्पेनचा बदली खेळाडू मिकेल मेरिनोने संपूर्ण सामन्याचे चित्र पालटले.
स्पेनच्या युवा बचावपटू पाउ क्यूबार्सीने बेल्जियमच्या गोलपोस्टच्या दिशेने एक जोरदार किक मारली. बेल्जियमचा राखीव गोलरक्षक सेने लामेन्स चेंडू पकडण्यासाठी पुढे सरसावला, मात्र चेंडू त्याच्या हातातून निसटला (रिबाउंड). अगदी याच संधीची वाट पाहत असलेल्या मिकेल मेरिनोने चेंडूवर ताबा मिळवत थेट गोल जाळ्यात धाडला आणि स्पेनला २-१ अशी विजयी आघाडी मिळवून दिली.
स्पेनने रचला इतिहास
या विजयामुळे स्पेनच्या संघाने विश्वचषकाच्या इतिहासात तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी स्पेनने २०१० च्या दक्षिण आफ्रिका विश्वचषकात उपांत्य फेरीत धडक मारली होती आणि अंतिम सामन्यात नेदरलँड्सचा १-० असा पराभव करत पहिल्यांदा जगज्जेतेपदावर नाव कोरले होते. बेल्जियमला धूळ चारत स्पेनने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सलग ३६ सामन्यांमध्ये अपराजित राहण्याचा ऐतिहासिक विक्रम केला आहे. स्पेनला शेवटचा पराभव २०२३ मध्ये कोलंबियाविरुद्ध पत्करावा लागला होता. या विजयासह स्पेनने २०१९-२०२२ दरम्यान अर्जेंटिनाने केलेल्या सलग ३६ सामने अपराजित राहण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आता इटलीच्या सलग ३७ सामन्यांच्या विश्वविक्रमापासून स्पेन अवघा एक पाऊल दूर आहे.
उनाई सिमोनचा ऐतिहासिक विक्रम मोडला
या विश्वचषकात स्पेनच्या भक्कम बचावामुळे प्रतिस्पर्धी संघांना गोल करणे अशक्य झाले होते. सामन्याच्या ३० व्या मिनिटाला स्पेनच्या फाबियन रुइजने शानदार गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. मात्र, ११ मिनिटांनंतर म्हणजेच ४१ व्या मिनिटाला बेल्जियमच्या चार्ल्स डी केटेलेरेने उत्कृष्ट मैदानी गोल करत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. या गोलमुळे स्पेनच्या या विश्वचषकातील सलग क्लीन शीटचा (एकही गोल न खाण्याचा) रेकॉर्ड तुटला. चार्ल्स डी केटेलेरेने स्पेनचा अव्वल गोलरक्षक उनाई सिमोनचा सलग ६५० मिनिटांपर्यंत गोल न खाण्याचा ऐतिहासिक विक्रम मोडीत काढला. असे असले तरी, उनाई सिमोनने विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक काळ गोल न खाण्याचा इटलीच्या दिग्गज वॉल्टर जेंगाचा (५१७ मिनिटे) प्रदीर्घ विक्रम आधीच मागे टाकला आहे.
इम्पॅक्ट प्लेअर मिकेल मेरिनो ठरला ‘मॅच विनर’
स्पेनसाठी मिकेल मेरिनो हा पुन्हा एकदा संकटमोचक ठरला आहे. त्याने सलग दुसऱ्या बाद फेरीच्या सामन्यात स्पेनला विजय मिळवून दिला. यापूर्वी प्री-क्वार्टर फायनलमध्ये पोर्तुगालविरुद्धच्या सामन्यात त्याने इंजरी टाईममध्ये विजयी गोल केला होता. बेल्जियमविरुद्धच्या सामन्यात मुख्य प्रशिक्षकांनी त्याला ८६ व्या मिनिटाला मैदानावर उतरवले आणि अवघ्या दोन मिनिटांत म्हणजेच ८८ व्या मिनिटाला त्याने निर्णायक गोल केला. मेरिनोचा हा फॉर्म थक्क करणारा आहे, कारण जानेवारी २०२६ मध्ये मँचेस्टर युनायटेडविरुद्ध खेळताना त्याच्या उजव्या पायाला ‘स्ट्रेस फ्रॅक्चर’ झाले होते. ही दुखापत अत्यंत गंभीर असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. सुमारे चार महिने पुनर्वसनात घालवल्यानंतर त्याने अत्यंत वेगाने तंदुरुस्ती मिळवून विश्वचषक संघात पुनरागमन केले आणि आता तो संघाचा सर्वात विश्वासार्ह ‘इम्पॅक्ट खेळाडू’ बनला आहे.
कोर्टुआची दुखापत बेल्जियमला पडली महागात
बेल्जियमच्या पराभवाचे मुख्य कारण ठरली ती त्यांच्या मुख्य गोलरक्षकाची दुखापत. बेल्जियमचा अनुभवी आणि स्टार गोलरक्षक थिबाउ कोर्टुआ सामन्याच्या ७१ व्या मिनिटाला मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. त्याच्या जागी युवा सेने लामेन्सला मैदानावर पाठवण्यात आले. मात्र, विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीचा प्रचंड दबाव लामेन्सला हाताळता आला नाही. सामन्याच्या शेवटच्या मिनिटांत क्यूबार्सीची सोपी किक त्याच्या हातातून निसटली आणि तोच बेल्जियमच्या पराभवाचा टर्निंग पॉईंट ठरला.
युरोपमधील दोन महासत्ता आमनेसामने
स्पेन आणि फ्रान्स हे सद्याच्या घडीला जागतिक फुटबॉलमधील सर्वाधिक बलाढ्य आणि संतुलित संघ मानले जातात. स्पेनचा संघ हा त्यांचा पारंपरिक ‘टिकी-टाका’ (वेगवान शॉर्ट पासेस आणि बॉल पजेशन) शैलीसाठी ओळखला जातो, तर दुसरीकडे फ्रान्सची ताकद ही त्यांची वेगवान काउंटर-अटॅक आणि मजबूत फॉरवर्ड लाईन आहे. या दोन भिन्न शैलींच्या महामुकाबल्यामुळे १४ जुलै रोजी होणारी ही उपांत्य फेरी या विश्वचषकातील सर्वात मोठी आणि रोमांचक लढत ठरणार आहे.