पत्रादेवी येथील हुतात्मा स्मृती स्मारकाचे लोकार्पण करताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह. सोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे व इतर.
....
गोवन वार्ता प्रतिनिधी
पेडणे : गोवा मुक्तिसंग्रामात मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या प्रत्येक हुतात्म्याला इतिहासात योग्य स्थान आणि सन्मान मिळालाच पाहिजे. गोवा मुक्तीसाठी रक्त सांडलेल्या एकाही हुतात्म्याचे नाव इतिहासाच्या पानांतून सुटता कामा नये. गोवा मुक्तिसंग्रामातील हुतात्मे आणि स्वातंत्र्यसैनिक यांच्याविषयी सखोल संशोधन करून त्यांची माहिती संकलित करण्याची गरज आहे. यासाठी राज्य सरकारने विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.
पत्रादेवी-पेडणे येथील गोवा मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांच्या स्मृतींना समर्पित हुतात्मा स्मृती स्मारकाचे लोकार्पण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्री दिगंबर कामत, रोहन खंवटे, नीळकंठ हळर्णकर, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, प्रेमेंद्र शेट, प्रवीण आर्लेकर, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदावेलू, स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाई, तसेच सरकारी अधिकारी, स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार, हुतात्म्यांचे कुटुंबीय आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राजनाथ सिंह आणि इतर मान्यवरांच्या हस्ते गोवा मुक्ती स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या स्वातंत्र्यवीरांवर गोवा सरकारच्या वतीने काढलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

संरक्षणमंत्री पुढे म्हणाले, गोव्याच्या मुक्तीसाठी अनेकांनी सर्वस्व पणाला लावले. अनेकांनी तुरुंगवास, छळ आणि हालअपेष्टा सहन केल्या, काहींनी प्राणांची आहुती दिली. या संघर्षातील प्रत्येकाचे योगदान आजच्या पिढीपर्यंत पोहोचले आहे का, याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. इतिहासाच्या नोंदींमध्ये एखाद्या हुतात्म्याचे नाव राहून गेले असेल, तर त्याचा शोध घेऊन त्याला योग्य स्थान मिळवून देणे ही आपली जबाबदारी आहे. हुतात्म्यांची नावे दस्तऐवजांपुरती मर्यादित न राहता ती कायमस्वरूपी स्मरणात राहावीत, यासाठी ती दगडावर कोरली जावीत. त्यामुळे भावी पिढ्यांना गोव्याचे स्वातंत्र्य सहज मिळालेले नसून त्यामागे असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग, संघर्ष आणि बलिदान आहे, याची जाणीव कायम राहील.
मुक्तिलढ्याचा समग्र इतिहास नव्या पिढीसमोर आणणार : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, गोवा मुक्तिसंग्रामाचा इतिहास १९४६ पासून सुरू झाला, असे मानणे योग्य ठरणार नाही. पोर्तुगीज राजवटीविरुद्ध गोमंतकीयांचा प्रतिकार त्याहीपूर्वी अनेक वर्षे सुरू होता. या प्रदीर्घ संघर्षातील विविध घटना, आंदोलने आणि बलिदानांचा समग्र इतिहास नव्या पिढीसमोर आणण्याची आवश्यकता आहे. कुंकळ्ळीचा ऐतिहासिक उठाव हा या संघर्षातील महत्त्वाचा अध्याय आहे. १९४६ मधील आंदोलनाने मुक्तिलढ्याला नवी दिशा आणि व्यापक स्वरूप मिळाले; मात्र त्यापूर्वीच्या संघर्षांचे योगदानही तितक्याच गांभीर्याने इतिहासात नोंदवले गेले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.


