पणजीः रेव्ह्युलेशनरी गोवन्स पक्षामधील अतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर यांनी राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने वाळपई मतदारसंघात पक्षाच्या सदस्यांची बैठक घेतल्यानंतर मनोज परब गटाच्या सदस्यांनी त्याला आक्षेप घेतला. परब गटातील आरजीपीच्या वाळपई मंडळाने बोरकर यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून ही बैठक बेकायदेशीर असल्याचा आरोप केला.
राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा ताबा घेतल्यानंतर आरजीपीची संघटना बळकट करण्यासाठी वीरेश बोरकर यांनी मतदारसंघात स्थानिक नेत्यांची बैठक घेणे सुरू केले आहे. पण बोरकर यांनी नेमकी वाळपई मतदारसंघात ही बैठक घेतल्यानंतर परब यांचे समर्थक रागावले व सोशल मिडीयावर व्यक्त होऊ लागले. आणि बोरकर यांच्यावर टीका करणे सुरू केले.
वाळपई मतदारसंघातील आरजीपी सदस्यांशी चर्चा करून पुढील रणनीती, संघटन बांधणी आणि येत्या विधानसभा निवडणुकीचा आढावा बोरकर यांनी घेतला. वाळपई हा आरजीपीचा मजबूत खांब आहे. आमचे समर्पित कार्यकर्ते आणि लोकाच्या मदतीने आम्ही आमची संघटना मजबूत करण्यास सुरूवात करणार, असे बोरकर यांनी सांगितले.
त्यानंतर सोशल मिडीयावर परब गटाच्या आरजीपी समर्थकांनी आणि माजी वाळपई गटाचे अध्यक्ष निलेश गावडे यांनी या बैठकीला आक्षेप घेतला. कुठल्या अधिकारांखाली ही बैठक घेतली, राष्ट्रीय मंडळाचे सदस्य कोण, बोरकर हे राष्ट्रीय अध्यक्ष कधी झाले आणि त्यांचा कार्यकाळ कधी संपतो असा प्रश्न गावडे यांनी केला.
याविषयी बोरकर यांच्याकडून अजूनही उत्तर आले नाही. पक्षाच्या संविधानीक तरतुदींनुसार राष्ट्रीय अध्यक्षाचा कार्यकाळ २०२४ साली संपतो. त्यामुळे कुठल्या अधिकाराखाली बोरकर हे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा करतात, असा प्रश्न गावडे यांनी उपस्थित केला.
२०२२ मध्ये मनोजना वाळपईत ५ हजार मते
दरम्यान, मनोज परब यांनी २०२२ ची विधानसभा निवडणूक वाळपई मतदारसंघातून मंत्री विश्वजित राणे यांच्याविरुद्ध लढवली होती. फुटबॉल चिन्हावर ५ हजार मते मिळवून त्यांनी दुसरे स्थान मिळवले होते. बोरकर यांनी यापूर्वी इतर मतदारसंघांत बैठका घेतल्या आहेत. पण नेमके वाळपई मतदारसंघात परब समर्थकांनी आक्षेप घेतल्याने या वादाला नवे वळण मिळाले आहे.


