पणजी : पोलीस शिपाई, रेंज फॉरेस्ट ऑफीसर, फॉरेस्ट गार्ड या पदांसाठी शारीरिक क्षमता चांचणी (पीईटी) १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. कुजिरा, बांबोळी येथील अटल स्टेडियमवर सकाळी ८.३० पासून या चाचणीला सुरवात होणार आहे. एकापेक्षा अधिक पदांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना एकदाच पीईटी द्यावी लागणार आहे. मात्र सर्व पदांसाठीची ॲडमिट कार्ड त्यांना सोबत ठेवावी लागणार आहे.
पीईटीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी ॲडमिट कार्ड व फोटो ओळखपत्राची प्रत आणणे आवश्यक आहे. पुरूष उमेदवारांसाठी १ ते ८ सप्टेंबरपर्यंत तर महिला उमेदवारांसाठी ९ व १० सप्टेंबर रोजी तुकडीप्रमाणे चाचणी होईल. मोजमाप वा चाचणी बाबत उमेदवार समाधानी नसल्यास अपील मंडळासमोर त्याच दिवशी अपील करण्याची मुभा आहे.
कर्मचारी भरती आयोगाने २० फेब्रुवारी २०२६ रोजी रेंज फॉरेस्ट ऑफीसर, प्लॅटून कमांडर, राऊंड फॉरेस्टर, पोलीस शिपाई (सैन्य दल), पोलीस शिपाई चालक, शिपाई (ग्रीजर), फॉरेस्ट गार्ड या पदांसाठी जाहीरात दिली होती. सीबीटी परीक्षेनंतर आता शारीरिक चाचणी सुरू होणार आहे.
घड्याळ, मोबायल फोन, डीजीटल डायरी, पेजर, कॅमेरा, सीडी, लॅपटॉप, टॅब्लेट नेण्यास परवानगी नाही, असे कळविण्यात आले आहे. फक्त पाण्याची बाटली नेण्यास परवानगी आहे.


