विधानसभा अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज

आगामी विधानसभा अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज झाले आहेत. कायदा-सुव्यवस्था, महागाई आणि कलम ३९ए वरून आगामी तीन दिवसांच्या विधानसभा अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती आखण्यात आल्याची माहिती आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी दिली.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
21 mins ago
विधानसभा अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज

पणजी : आगामी गोवा विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांमध्ये एकत्र येण्याबाबत आणि संयुक्त रणनीती आखण्याबाबत  चर्चा सुरू असल्याची माहिती आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी दिली. आगामी अधिवेशनात जनता आणि राज्याशी संबंधित विविध गंभीर मुद्द्यांवरून सत्ताधारी सरकारला जाब विचारण्यासाठी विरोधी पक्ष पूर्णपणे सज्ज झाले आहेत.

अधिवेशनादरम्यान राज्यातील कायदा व सुव्यवस्था, रस्ते सुरक्षा, महिलांची सुरक्षा, अबकारी खात्यातील कारभार, तसेच वादग्रस्त ठरलेले '३९ए' कलम यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सरकारला घेरले जाईल, असे आमदार व्हिएगस यांनी स्पष्ट केले. याशिवाय साखरेचे दर प्रतिकिलो ७५ रुपये आणि पेट्रोलचे दर ११४ रुपयांपर्यंत पोहोचल्यामुळे वाढलेल्या महागाईचा मुद्दाही विरोधी आमदारांकडून सभागृहात प्रामुख्याने उपस्थित केला जाणार आहे.

अधिवेशनाचा कालावधी अवघा तीन दिवसांचा असल्यामुळे प्रत्येक आमदाराला आपली भूमिका मांडण्यासाठी अत्यंत मर्यादित वेळ मिळणार आहे. मात्र, या उपलब्ध वेळेत सर्व महत्त्वाच्या विषयांवर प्रभावीपणे चर्चा घडवून आणण्यासाठी विरोधी पक्षांचे नियोजन सुरू आहे. कलम ३९एच्या संदर्भात जनतेच्या वतीने सुमारे ५,७०० हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. आता सुनावणीची प्रतीक्षा आहे. अधिवेशनाच्या पटलावर हा विषय मांडून जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवला जाईल. या लढ्यात सर्वसामान्य नागरिक, तरुण आणि निवृत्त कर्मचाऱ्यांनी विधानसभेच्या बाहेरून पाठिंबा देऊन सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा
सर्व पहा