मांद्रे : ५५ वर्षांची मूर्तिकलेची परंपरा जपणारे रमेश शेटमांद्रेकर

‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या गणेश मूर्तींवर कारवाईची मागणी; “८० टक्के माती आणि २० टक्के ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ मिसळून मूर्ती बनवता येते, असे म्हणणाऱ्यांनी माझ्यासमोर येऊन मूर्ती करून दाखवावी. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून मातीच्या मूर्ती बनवत आहोत; मात्र आजपर्यंत ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’चा वापर केलेला नाही,” असे शेटमांद्रेकर यांनी सांगितले.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
22 mins ago
मांद्रे : ५५ वर्षांची मूर्तिकलेची परंपरा जपणारे रमेश शेटमांद्रेकर

पेडणे : “८० टक्के माती आणि २० टक्के ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ मिसळून मूर्ती बनवता येते, असे म्हणणाऱ्यांनी माझ्यासमोर येऊन मूर्ती करून दाखवावी. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून मातीच्या मूर्ती बनवत आहोत; मात्र आजपर्यंत ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’चा वापर केलेला नाही,” असे गेली ५५ वर्षांची मूर्त‌िकलेची परंपरा जपणारे रमेश शेटमांद्रेकर यांनी सांगितले.

गोव्यात आज अनेक मूर्तिकार आपली कला जोपासत असले तरी पारंपरिक मूर्तिकलेचा वारसा जपणारे कलाकार दिवसेंदिवस कमी होत आहेत. देऊळवाडा, मांद्रे येथील रमेश शेटमांद्रेकर हे गेल्या तब्बल ५५ वर्षांपासून मातीला आकार देऊन गणेशमूर्ती घडवत आहेत. आपल्या पूर्वजांची कला आजही तितक्याच निष्ठेने पुढे नेत आहेत.

रमेश शेटमांद्रेकर यांना मूर्तिकलेचा वारसा त्यांच्या आजोबा आणि वडिलांकडून मिळाला. दहावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी या पारंपरिक कलेकडे पूर्णवेळ वळण्याचा निर्णय घेतला. आज त्यांचे वय ७५ वर्षे आहे. तरीही त्याच उत्साहाने मूर्ती बनवत आहेत.  त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १० कामगार तसेच कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने दरवर्षी ७०० ते ८०० गणेशमूर्ती तयार केल्या जातात.

मोठे कुटुंब असल्याने मूर्ती बनविण्याच्या कामात घरातील प्रत्येक सदस्य आपापल्या परीने हातभार लावतो. त्यामुळे हा व्यवसाय केवळ उदरनिर्वाहाचे साधन नसून त्यांच्या कुटुंबाच्या अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या परंपरेचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.

‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींबाबत चिंता

रमेश शेटमांद्रेकर यांनी बाजारात वाढत असलेल्या ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या गणेशमूर्तींबाबत चिंता व्यक्त केली. त्यांच्या मते, अशा मूर्तींमुळे पारंपरिक मातीच्या मूर्ती बनविणाऱ्या स्थानिक कलाकारांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

‘प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर कारवाईची गरज 

गोव्यात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती येऊ नयेत आणि बाजारात त्यांची विक्री होऊ नये यासाठी कारवाईची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. अनेक वर्षांपासून याबाबत चर्चा होत असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार, हा प्रश्न कायम असल्याचे त्यांनी सांगितले.

युवा पिढीने पारंपरिक कला जपावी

आजच्या युवा पिढीने आपल्या पूर्वजांकडून मिळालेली पारंपरिक कला शिकून ती पुढे नेणे गरजेचे आहे, असे आवाहन रमेश शेटमांद्रेकर यांनी केले. “कला जतन करणे ही काळाची गरज आहे. युवा पिढीने आपल्या पूर्वजांची कला पुढे नेली, तर भविष्यात या कलेला चांगले दिवस येऊ शकतात. स्थानिक कलाकार आणि पारंपरिक मातीच्या मूर्तींना प्रोत्साहन मिळाले पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.

चिकण मातीच्या गणेशमूर्तींनाच प्राधान्य द्या 

यंदाच्या गणेशोत्सवात भक्तांनी पर्यावरणपूरक चिकण मातीच्या गणेशमूर्तींनाच प्राधान्य द्यावे आणि ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींचा वापर टाळावा,  असे आवाहनही रमेश शेटमांद्रेकर यांनी केले. पारंपरिक मूर्तिकलेचा ५५ वर्षांचा वारसा जपत आजही शेकडो गणेशमूर्ती घडविणारे रमेश शेटमांद्रेकर हे गोव्यातील स्थानिक कलाकारांच्या जिद्दीचे आणि कलेवरील प्रेमाचे उत्तम उदाहरण ठरत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा