पणजी : फळांचा राजा असलेल्या आंब्यासाठी गोव्यात सध्या सुवर्णकाळ सुरू असून, गेल्या तीन वर्षांत राज्यातील आंब्याच्या लागवडीत आणि उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. शेतकी संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत आंब्याच्या लागवडीत दीड टक्क्याने, तर उत्पादनात ९ टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे.
२०२३-२४ ते २०२५-२६ या तीन वर्षांच्या काळात गोव्यात एकूण १५,३९५ हेक्टर क्षेत्रावर ३१,५१२ टन आंब्याचे उत्पादन झाले आहे. राज्यात दरवर्षी सरासरी ५ हजार हेक्टर जमिनीत लागवड होऊन सुमारे १० हजार टन आंब्याचे उत्पन्न मिळते. वर्ष २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये आंब्याच्या लागवडीत ५९ हेक्टरने, तर उत्पादनात ३६१ टनांची वाढ झाली. त्यानंतर २०२५-२६ मध्येही ही वाढ कायम राहून, २०२४-२५ च्या तुलनेत लागवडीत आणखी ७ हेक्टरची, तर उत्पादनात ५५३ टनांची भर पडली.
२०२३-२४ मध्ये ५,०९० हेक्टर क्षेत्रावर १०,०७९ टन उत्पादन झाले होते. २०२४-२५ मध्ये लागवड ५,१४९ हेक्टरवर पोहोचून उत्पादन १०,४४० टनांवर गेले. तर २०२५-२६ मध्ये लागवड ५,१५६ हेक्टरवर आणि उत्पादन १०,९९३ टनांवर पोहोचले.
गोव्यातील सर्वच्या सर्व बारा तालुक्यांत आंब्याची लागवड केली जाते. यामध्ये प्रामुख्याने प्रसिद्ध ‘मानकुराद’ आंब्याचा सर्वाधिक समावेश आहे. यंदाच्या हंगामात उत्तर गोव्यात १,११९ हेक्टर, तर दक्षिण गोव्यात ४,०३७ हेक्टर क्षेत्रावर आंब्याचे उत्पादन घेतले गेले.
बॉक्स
तालुकानिहाय आंब्याची लागवड (क्षेत्र हेक्टरमध्ये):
उत्तर गोवा:
सत्तरी: २७६
बार्देस: २६०
तिसवाडी: २३५
पेडणे: २२२
डिचोली : १२६
दक्षिण गोवा:
सासष्टी: १,६०६
सांगे: ७२५
काणकोण: ६६७
फोंडा: ४७५
केपे: २९४
धारबांदोडा: १३५
मुरगाव: १३५


