म्हापसा : गेल्या काही महिन्यांपासून येत असलेल्या अवाजवी आणि अनियमित वीज बिलांमुळे संतप्त झालेल्या कोलवाळ येथील ग्रामस्थांनी म्हापसा येथील वीज खात्याच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. सरपंच रितेश वारखंडकर आणि माजी सरपंच नित्यानंद कांदोळकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या तोंडावर आलेली भरमसाट बिले पाहून आम्ही संकटात सापडलो आहोत, असा जाब विचारत ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले.
वीज खात्याकडून दरमहा बिल न देता ४५ ते ६० दिवसांनी किंवा २ ते ३ महिन्यांनी एकत्र बिल दिले जात आहे. यामुळे युनिटचा वापर वाढून ग्राहकांना उच्च वीज दर आणि दंडात्मक शुल्काचा फटका बसत असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनात आणून दिले. मागील चार महिन्यांत वीज बिलांच्या रकमेत अचानक दुप्पट ते तिप्पट वाढ झाली आहे. पूर्वी ५०० ते २,००० रुपयांपर्यंत येणारी बिले आता थेट ४,००० ते १७,००० रुपयांपर्यंत आली आहेत. दोन खोल्यांच्या घरात राहणाऱ्या आणि अवघे १० हजार रुपये मासिक उत्पन्न असणाऱ्या गरीब कुटुंबांवर, तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांवर यामुळे मोठा आर्थिक भार पडला आहे.
गेल्या चार महिन्यांतील सर्व बिलांची तातडीने फेरपडताळणी करून त्रुटी दूर कराव्यात, उशिरा बिल पाठवल्यामुळे आकारलेले अतिरिक्त शुल्क व दंड माफ करावा आणि दरमहा ३० दिवसांचे नियमित मीटर रीडिंग घेऊन बिले द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना बिलात दिलासा देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
आंदोलनाचा इशारा
वीज खात्याने आगामी १५ दिवसांच्या आत यावर योग्य तोडगा न काढल्यास शांततामय मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा सज्जड इशारा कोलवाळवासीयांनी दिला आहे. १ एप्रिल २०२६ पासून नवीन वीज दर लागू करण्यात आले असून, उन्हाळ्यातील वाढलेला वीजवापर यामुळे बिलांची रक्कम वाढली आहे. बिले देण्यास तात्पुरता विलंब झाला असला, तरी लवकरच दर महिन्याला नियमित बिल देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे वीज खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.


