मोपा, तांबोसे, उगवेत हत्तीकडून बागायतींची नासधूस

दोन तास रस्ता रोखल्याने वाहतूक ठप्प : सरकारच्या निष्क्रियतेवर शेतकऱ्यांचा संताप

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
19 mins ago
मोपा, तांबोसे, उगवेत हत्तीकडून बागायतींची नासधूस

पेडणे : मोपा, तांबोसे आणि उगवे परिसरात तब्बल चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर ‘ओंकार’ हत्ती पुन्हा परतला आहे. गावात पुनरागमन करताच या हत्तीने बागायतींमध्ये घुसखोरी करत केळी, पोफळी आणि इतर पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस सुरू केली आहे. कष्टाने उभी केलेली पिके डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
शेतकरी शशिकांत महाले यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चार वर्षांपासून मुलांप्रमाणे जपलेली व वाढवलेली झाडे या हत्तीने उद्ध्वस्त केल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई केवळ पैशात मोजता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, वारंवार नुकसान भरपाईच्या चक्रात अडकवण्यापेक्षा सरकारने या हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली.
पंच दयानंद गवंडी यांनी सांगितले की, यापूर्वी १७ एप्रिल २०२६ रोजी हा हत्ती या भागात आला होता. आता चार महिन्यांच्या अंतरानंतर त्याने पुन्हा बागायतींचे नुकसान चालवले आहे. शासनाकडून केवळ नुकसान भरपाई नको, तर आमच्या कष्टाच्या उत्पन्नाच्या साधनांना हत्तीपासून सुरक्षा द्यावी, अशी स्थानिकांची भूमिका आहे.
स्थानिक नागरिक अशोक परब यांनी संताप व्यक्त करताना म्हटले की, दरवर्षी ओंकार येतो, बागा उद्ध्वस्त करतो, त्यावर बातम्या येतात आणि प्रशासन केवळ पाह्याची भूमिका घेते. आणखी किती मोठे नुकसान झाल्यावर सरकार ठोस निर्णय घेणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
रस्त्यावर दोन तास हत्तीचा ताबा
सोमवारी सकाळी मोपा परिसरातील मुख्य रस्त्यावर ओंकार हत्तीने जवळपास दोन तास ठाण मांडल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. हत्ती रस्त्याच्या मधोमध उभा राहिल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांची मोठी कोंडी झाली. यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी, तसेच कामावर निघालेले नागरिक व कामगार यांना वेळेत पोहोचता आले नाही. वन खात्याचे कर्मचारी हत्तीला सुरक्षितपणे हटवण्यासाठी सतत प्रयत्न करत होते.
‘ओंकार’च्या पुनर्वसनासाठी गोवा-महाराष्ट्र प्रशासनामध्ये चर्चा
सिंधुदुर्गातून ‘ओंकार’ नावाचा हा हत्ती चौथ्यांदा मोपा परिसरात दाखल झाला आहे. या हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी गोव्याच्या वन अधिकाऱ्यांची महाराष्ट्राच्या वन अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू असून, आगामी दोन ते तीन दिवसांत यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याच्या वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. शेतकऱ्यांचे ओंकार हत्तीने पुन्हा एकदा तांबोसे-मोपा परिसरात आगमन करून पूर्वीप्रमाणेच शेतीची नासधूस सुरू केली आहे. या हत्तीला हुसकावून लावण्यासाठी वन खात्याचे ५० जवान दिवस आणि रात्र असा पहारा देत आहेत. सिंधुदुर्ग भागातही हा हत्ती शेतीचे नुकसान करत असल्याने तिथले शेतकरी त्याला हुसकावून लावतात, ज्यामुळे तो वारंवार गोव्यात येतो. मोपा, तांबोसे परिसरातील रस्ते आणि परिसर या हत्तीला चांगलाच परिचयाचा झाल्यामुळे त्याला तिथून हटवणे कठीण बनले आहे. त्यामुळे त्याला महाराष्ट्रातच एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची गरज असून, त्याबाबत चर्चा सुरू असल्याचे वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शेतकर्‍यांनी झालेल्या नुकसानीची भरपाई मागितली असून, यापूर्वी ओंकार हत्तीचे ‘वनतारा’ येथे पुनर्वसन करण्याविषयी चर्चा झाली होती; परंतु वनतारामध्ये त्याचे पुनर्वसन होणे अशक्य असल्याने तो प्रस्ताव आता रद्द करण्यात आला आहे. हा हत्ती महाराष्ट्राचा असल्याने महाराष्ट्र सरकारनेच त्यावर कायमस्वरूपी उपाय काढावा, असे वन खात्याचे अधिकारी जीस वर्की यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा
सर्व पहा