पेडणे: ‘गेस्ट हाऊस’मध्ये घुसला बिबट्या; कुत्र्याला घेऊन जंगलात पसार

सहा महिन्यांत चार कुत्र्यांचा फडशा? : वरचावाडा-नानोस्करवाडा येथे ‘गेस्ट हाऊस’मध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर १.३० वाजता बिबट्यावर कुत्र्याने हल्ला करण्याची घटना घडली. कुत्र्याचा पाठलाग करत बिबट्या ‘गेस्ट हाऊस’च्या पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचला. त्यानंतर कुत्र्याला पकडून सुमारे आठ फूट उंचीवरून उडी मारत तो जवळच्या जंगलात पसार झाला.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
37 mins ago
पेडणे: ‘गेस्ट हाऊस’मध्ये घुसला बिबट्या; कुत्र्याला घेऊन जंगलात पसार

पेडणे : वरचावाडा-नानोस्करवाडा येथे ‘गेस्ट हाऊस’मध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर १.३० वाजता बिबट्यावर कुत्र्याने हल्ला करण्याची घटना घडली.   कुत्र्याचा पाठलाग करत बिबट्या ‘गेस्ट हाऊस’च्या पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचला. त्यानंतर कुत्र्याला पकडून सुमारे आठ फूट उंचीवरून उडी मारत तो जवळच्या जंगलात पसार झाला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘गेस्ट हाऊस’चे मालक  उल्हास नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीनंतर अंगणात कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला. काही वेळातच कुत्रा पहिल्या मजल्याच्या दिशेने धावला आणि त्याच्या मागोमाग बिबट्याही आत शिरला.

कुत्र्याने पुन्हा खाली येण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याने मागून झडप घालत त्याच्या मानेचा चावा घेतला. त्यानंतर बिबट्याने कुत्र्यासह पहिल्या मजल्यावरून सुमारे आठ फूट खाली उडी मारली आणि जवळच्या जंगलात धूम ठोकली.

सहा महिन्यांत चार कुत्र्यांचा फडशा

दरम्यान, गेल्या सहा महिन्यांत या परिसरात बिबट्याने चार कुत्र्यांचा फडशा पाडल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाकडे वारंवार तोंडी तक्रारी करूनही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

गेल्या महिन्यातही बिबट्याने दोन कुत्र्यांना लक्ष्य केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यावेळी वन विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही बिबट्याचा वावर कायम असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. बिबट्या थेट घरात शिरल्याने आपल्याला मोठी भीती वाटल्याचे उल्हास नाईक यांनी सांगितले.

पाळीव कुत्र्याला बिबट्याने उचलून नेल्याने परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वन विभागाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.  आमदार जित आरोलकर यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा
सर्व पहा