पंचायतीने परवानगी नाकारली, तरी वरिष्ठ पातळीवरून बांधकामांना परवानगी!

बेताळभाटी सरपंचांकडून हतबलता व्यक्त : ग्रामसभेत एआय कॅमेर्‍यांवर चर्चा

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
23rd August, 11:51 pm
पंचायतीने परवानगी नाकारली, तरी वरिष्ठ पातळीवरून बांधकामांना परवानगी!

मडगाव : बेताळभाटी ग्रामसभेत गावातील बांधकामांना पंचायतीने परवानगी नाकारलेली असतानाही वरिष्ठ पातळीवरुन परवानगी दिली जाते. त्यात पंचायत काही करू शकत नसल्याचे सरपंच मिनू फर्नांडिस यांनी सांगितले. याशिवाय जंक्शननजीक शाळा, चर्चा व इतर आस्थापने असल्याने एआय कॅमेर्‍यांमुळे नाहक भुर्दंड स्थानिकांना पडणार असल्याने त्यावर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

बेताळभाटीची ग्रामसभा रविवारी सकाळी सरपंच मिनू फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ग्रामसभेत पंचायतघराचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन सरपंचांनी दिले. बेताळभाटी येथील जंक्शनवरील सिग्नलवर बसवण्यात आलेल्या एआय कॅमेर्‍यांमुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. सध्या लोकांच्या मागणीनुसार ते कॅमेरे बंद ठेवण्यात आलेले आहेत. याच जंक्शननजीक शाळा, चर्च, पंचायत, बाजार असल्याने काहीवेळा स्थानिकांना हेल्मेट नसल्याने दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करण्याची मागणी ज्योकीम फालेरो यांनी केली.

गावात अनेक बांधकामे केली जात आहेत. ज्याठिकाणी कामे केली जात आहेत, त्याठिकाणी कामाबाबत आवश्यक माहिती देणारे फलक असणे कायद्यानुसार आवश्यक आहे. परंतु, ते होत नाही. त्यामुळे कामांच्या ठिकाणी फलक उभारण्यात यावेत, अशा सूचना पंचायतीने द्याव्यात, अशी मागणी केली.

सरपंच फर्नांडिस यांनी सांगितले की, बेताळभाटी पंचायतीने ग्रामसभेत झालेल्या ठरावानुसार प्रकल्पांना मंजुरी दिली नाही. मात्र, सदर बांधकाम करणार्‍या व्यक्तींनी प्रकल्पाच्या मंजुरीसाठी गटविकास अधिकारी तसेच उपसंचालकांसह वरिष्ठ पातळीवर दाद मागितली. त्याठिकाणी आवश्यक कागदपत्रे असल्याची खात्री केल्यानंतर बांधकामाला परवानगी देण्यात येते. कायद्यानुसार ही परवानगी दिली जाते, त्यात पंचायतीकडून पुन्हा आक्षेप घेता येत नाही, असे सरपंचांनी सांगितले.

पंचायतीत सीसीटीव्ही बसवावेत : सावियो

पंचायत कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत. ते लवकरच बसवण्यात यावेत. यापूर्वी चारपेक्षा जास्त ग्रामसभेत बेताळभाटी पंचायतीची वेबसाइट अपडेट करण्याची मागणी केलेली आहे. पण अद्यापही त्याबाबत काहीही सुधारणा झालेली नाही. या वेबसाइटवर सभा, आवश्यक अर्ज, बांधकामांना मंजुरीबाबत माहिती देण्याची मागणी सावियो रॉड्रिग्ज यांनी केली. 

हेही वाचा
सर्व पहा