पाटो-पणजी येथील ‘सोहो’ क्लबजवळ हाणामारीप्रकरणी ८ जणांना अटक

सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी पणजी पोलिसांची कारवाई

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
23rd August, 11:40 pm
पाटो-पणजी येथील ‘सोहो’ क्लबजवळ हाणामारीप्रकरणी ८ जणांना अटक

पाटो-पणजी येथील ‘सोहो’ क्लबजवळ दोन गटांत झालेली हाणामारी.

पणजी : पाटो-पणजी येथील ‘सोहो’ क्लबजवळ रविवारी, २३ ऑगस्ट रोजी पहाटे दोन गटांत झालेल्या हाणामारीप्रकरणी पणजी पोलिसांनी आठ जणांना अटक केली. सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करून एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे ४ ते ४.४५ या वेळेत ‘सोहो’ क्लबजवळ दोन गटांतील संशयित एकत्र जमले. यावेळी त्यांच्यात शिवीगाळ आणि मारामारी झाली. या प्रकारामुळे सार्वजनिक शांतता भंग होऊन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेत कारवाई सुरू केली.
पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी दिलेल्या तक्रारीवरून पणजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहन मडगावकर यांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १९४(२), ११५(२) आणि ३५२ अंतर्गत कारवाई केली.हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला. दोन्ही गटांतील संशयितांची ओळख पटवून पोलिसांनी त्यांना अटक केली. प्रकरणाचा पुढील तपास पणजी पोलीस करत आहेत.
आठ संशयितांना अटक

या प्रकरणी पणजी पोलिसांनी चिंचणी-सासष्टी येथील प्रचय कोलापटे (२१), जेडन रिबेल्लो (१९), अलरॉय व्हिएगस (२२), अश्बेल फेर्राव (२२), सांताक्रूझ येथील मुकेश सिंग (२१), जोसेफ कार्दोझो (२१), करंझाळे येथील रॉयडन मिस्किटा (२२) आणि बाणावली येथील जॉय फर्नांडिस (२२) यांना अटक करण्यात आली आहे.      

हेही वाचा
सर्व पहा