पणजी : राज्यातील विविध ठिकाणी भूखंड आणि फ्लॅट्स देण्याचे आमिष दाखवून अनेकांकडून ४७ लाख रुपये घेत फसवणूक केल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी काजल प्रकाश नानोसकर (२५, रा. कुचेली-बार्देश, मूळ गिरकरवाडा-हरमल) हिला अटक केली आहे. तिने तक्रारदारासह इतरांचीही फसवणूक केल्याचा आरोप आहे.
पर्वरी येथील संतोष वळवईकर यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, काजल नानोसकर हिने ३० जूनपूर्वी राज्यातील विविध ठिकाणी भूखंड आणि फ्लॅट्स उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी तक्रारदाराकडून ४७ लाख रुपये घेतले. मात्र, ठरल्याप्रमाणे भूखंड किंवा फ्लॅट्स दिले नाहीत तसेच घेतलेली रक्कमही परत केली नाही, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पर्वरी येथील संतोष वळवईकर यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, काजल नानोसकर या महिलेने ३० जूनपूर्वी राज्यात विविध ठिकाणी भूखंड आणि फ्लॅट्स देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्याच्याकडून ४७ लाख रुपये घेतले. दरम्यान, संशयित महिलेने त्यांना ठरल्याप्रमाणे भूखंड आणि फ्लॅट्स दिले नाही. तसेच पैसे परत केले नाही.
तक्रारीची दखल घेत पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विघ्नेश नाईक यांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. संशयित महिला कुचेली-बार्देश परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पर्वरी पोलिसांनी रविवारी, २३ रोजी तिला अटक केली. अटक केलेल्या संशयित महिलेला सोमवारी पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच इतर व्यक्तींचीही फसवणूक झाली आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.


