४० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तारक आरोलकर याला अटक

बनावट विक्री कराराद्वारे जमिनीचा मालक असल्याचे भासवून गंडा

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
19th August, 11:50 pm
४० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तारक आरोलकर याला अटक

पणजी : आसगाव येथील जमिनीचा मालक असल्याचे भासवून बनावट विक्री कराराद्वारे दिल्लीतील पंकज बजाज यांची ४० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा शाखेने म्हापशाचे माजी नगरसेवक तारक आरोलकर याला अटक केली आहे. पोलीस कोठडीसाठी त्याला गुरुवारी, २० ऑगस्ट रोजी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.गुन्हा शाखेच्या माहितीनुसार, दिल्ली येथील पंकज बजाज यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोलकर याने आसगाव येथील सर्व्हे क्रमांक ३७/४ मधील जमीन आपली असल्याचे भासवले. तक्रारदाराचा विश्वास संपादन करण्यासाठी जमिनीचा बनावट विक्री करारही दाखवण्यात आला. त्यानंतर जमीन खरेदीसाठी तक्रारदार बजाज यांनी आरोलकरच्या म्हापसा येथील आयसीआयसीआय बँक खात्यात ४० लाख रुपये जमा केले.
रक्कम स्वीकारल्यानंतर आरोलकर याने विक्री करार पूर्ण केला नाही तसेच पैसेही परत केले नाहीत. २ नोव्हेंबर २०२२ ते १७ ऑगस्टदरम्यान हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. तक्रारदाराने जमिनीबाबत अधिक चौकशी केली असता ती जोसेफ मारियान डिसोझा ऊर्फ जुझे एम. डिसोझा यांच्या मालकीची असल्याचे समोर आले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने बजाज यांनी गुन्हा शाखेकडे तक्रार दाखल केली.
विविध कलमांखाली गुन्हा नोंद
गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमीन नाईक यांनी तपास सुरू केला. आरोलकर याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४०६, ४६७, ४६८ आणि ४७१ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गुरुवारी न्यायालयात करणार हजर 
बुधवारी, १९ ऑगस्ट रोजी गुन्हा शाखेने तारक आरोलकर याला अटक केली. पुढील तपासासाठी पोलीस कोठडी मिळावी यासाठी त्याला गुरुवारी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.      

हेही वाचा
सर्व पहा