पणजी : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या गोवा भेटीनंतर राज्यातील विरोधी पक्षांमध्ये युतीबाबतच्या राजकीय प्रक्रियेला अचानक वेग आला आहे. आम आदमी पक्ष (आप) तसेच रिव्हॉल्युशनरी गोवन्स पार्टी (आरजी) सोबत आगामी एक ते दोन दिवसांत युतीबाबत सविस्तर चर्चा होणार असल्याचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय, युतीबाबत गोवा फॉरवर्ड पक्षाच्या भूमिकेची आणि निर्णयाची काँग्रेस प्रतीक्षा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम पार पडल्यानंतर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना युतीबाबत भाष्य केले. आरजीचे नेते आमदार विरेश बोरकर आणि 'आप'चे राज्य संघटक वाल्मिकी नाईक हे आपापल्या पूर्व नियोजित कार्यक्रमांत व्यस्त असल्याने आतापर्यंत त्यांच्याशी थेट चर्चा होऊ शकली नव्हती; मात्र येत्या दोन दिवसांत त्यांच्याशी सकारात्मक संवाद साधला जाईल, असा विश्वास चोडणकर यांनी व्यक्त केला.
राज्यात विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव वेगाने सुरू झाली आहे. काँग्रेसच्या बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीची बैठक घेतली होती. या बैठकीत विरोधी पक्षांच्या युतीबाबत स्थानिक पातळीवरील नेत्यांनीच चर्चा करावी आणि त्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले होते. स्थानिक पातळीवर चर्चा पूर्ण होऊन निर्णय झाल्यानंतरच अंतिम मान्यतेसाठी तो हायकमांडकडे पाठवला जाईल, असे खर्गे यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आता काँग्रेस इतर विरोधी पक्षांशी चर्चा करणार आहे.
दुसरीकडे, युतीच्या चर्चेसाठी आरजी पक्षही तितकाच उत्सुक असून त्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती आरजीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार विरेश बोरकर यांनी दिली. लवकरच आरजीच्या प्रदेश अध्यक्षांची निवड केली जाणार असून, त्यानंतर काँग्रेसशी अधिकृत चर्चा करण्यासाठी अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली ही समिती कार्यरत होईल, असे बोरकर यांनी स्पष्ट केले.


