तूट ३१.४ टक्के, तरीही देशातील सर्वाधिक पाऊस गोव्यात

देशभरात सरासरी २१ इंच पाऊस : तामिळनाडूत सर्वांत कमी फक्त ५.७४ इंच


19th August, 11:24 pm
तूट ३१.४ टक्के, तरीही देशातील सर्वाधिक पाऊस गोव्यात

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : ‘एल निनो’ प्रणालीसह अन्य वातावरणीय कारणांमुळे यंदा देशासह राज्यात मान्सूनचे प्रमाण कमी आहे. ओडिशा आणि लडाख वगळता अन्य राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांत पावसाची तूट मोठी आहे. गोव्यात १ जून ते १९ ऑगस्ट दरम्यान पावसाची तूट ३१.४ टक्के आहे. असे असले तरी देशात सर्वाधिक पावसाची नोंद गोव्यातच झाली आहे. वरील कालावधीत गोव्यात ६७.४५ इंच पावसाची नोंद झाली आहे. गोव्यानंतर केरळ (४८.६९ इंच), सिक्कीम (४६ इंच), ओडिशा (३९.५४ इंच) या राज्यांचा क्रमांक लागतो.
वरील कालावधीत तामिळनाडूमध्ये सर्वांत कमी ५.७४ इंच पाऊस पडला आहे. आंध्र प्रदेश (७.५७ इंच), पंजाब (८.३७ इंच), राजस्थान (१०.४४ इंच) या राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. यंदा मान्सून केरळमध्ये ४ जून, गोव्यात ५ जून रोजी दाखल झाला होता. ९ जुलैपर्यंत मान्सूनने संपूर्ण देशाला व्यापले होते. १ जून ते १९ ऑगस्ट दरम्यान संपूर्ण देशात सरासरी २१ इंच पावसाची नोंद झाली आहे. यंदा देशात पावसाचे प्रमाण १३ टक्क्यांनी कमी आहे. या काळात देशात साधारणपणे २४.०८ इंच पावसाची नोंद होते.
बुधवारी राज्यात संततधार पाऊस पडला. हवामान खात्याने २० ते २५ ऑगस्ट दरम्यान राज्यात तुरळक पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३१ ते ३२ अंश, तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. पाऊस कमी असल्याने बुधवारी राज्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली. पणजीत किमान २६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे ऑगस्ट महिन्यातील आठवे सर्वाधिक किमान तापमान ठरले आहे. मुरगावमध्ये कमाल तापमान ३२ अंश व किमान तापमान २६.४ अंश सेल्सिअस राहिले.
वाळपईमध्ये सर्वाधिक ९५.३१ इंच पावसाची नोंद
राज्यात १ जून ते १९ ऑगस्ट दरम्यान वाळपईमध्ये सर्वाधिक ९५.३१ इंच पावसाची नोंद झाली आहे. धारबांदोडामध्ये ९४.८१ इंच, सांगेमध्ये ९१.५९ इंच, केपेमध्ये ८३.८९ इंच, काणकोणमध्ये ७४.०२ इंच, साखळीमध्ये ७०.८० इंच, फोंडामध्ये ६८.०७ इंच, पेडणेमध्ये ५८.८१ इंच, जुने गोवामध्ये ५८.८० इंच पावसाची नोंद झाली आहे. यादरम्यान पणजीमध्ये सर्वात कमी म्हणजेच ४२.८० इंच पाऊस पडला आहे. धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने बहुतेक धरणे भरली आहेत. १९ ऑगस्ट रोजी आमठाणे धरण ९६ टक्के, तर अंजुणे धरण ९२ टक्के भरले होते.             

हेही वाचा
सर्व पहा