गोव्यातील मासळी बाजारात 'ईसवण' दुर्मिळ; दर गगनाला भिडले

गोव्याच्या मासळी बाजारात मान्सूनच्या काळात मुबलक प्रमाणात उपलब्ध होणारा 'ईसवण' (सुरमई) यंदा दुर्मिळ झाला असून. जेवढे काही उपलब्ध आहेत त्यांची किमत प्रचंड असल्याने सामान्य ग्राहकाला ते परवडत नाहीत. हवामानातील बदल, कामगारांची टंचाई आणि एलईडी मासेमारी यांमुळे ही टंचाई निर्माण झाली आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
3 hours ago
गोव्यातील मासळी बाजारात 'ईसवण' दुर्मिळ; दर गगनाला भिडले

पणजी : गोव्याच्या मासळी बाजारात दरवर्षी मान्सूनच्या काळातही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणारा आणि गोवेकरांचा अत्यंत लाडका असलेला 'ईसवण' म्हणजेच सुरमई (Kingfish) यंदा मासळी बाजारातून अचानक गायब झाला आहे. गोव्याच्या खाद्यसंस्कृतीचा मुख्य भाग असलेला हा मासा बाजारात सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने ग्राहक, पारंपरिक मच्छीमार, ट्रॉलर मालक आणि मासळी विक्रेते यांच्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. नेहमी मासळी बाजारात आणि हॉटेलच्या मेन्यू कार्डवर वर्चस्व गाजवणारा हा राजा मासा गायब झाल्याने बाजारातील मासळीचा संपूर्ण पुरवठा विस्कळीत झाला असून इतर माशांचे भावही प्रचंड वधारले आहेत.


The joy of not knowing


सुरमई माशांच्या या भीषण तुटवड्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत, यावर मच्छीमार व्यावसायिक आणि संबंधित संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये तीव्र मतभेद पाहायला मिळत आहेत. 'ऑल गोवा फिशिंग बोट ओनर्स असोसिएशन'चे (AGFBOA) अध्यक्ष जोस फिलिप डिसोझा यांच्या मते, यावर्षी उशिरा आलेला मान्सून, वाऱ्याच्या बदलत्या दिशा आणि समुद्रातील खवळलेली परिस्थिती यांसारख्या हवामान बदलांमुळे सुरमईची उपलब्धता कमालीची घटली आहे. बदलत्या हवामानामुळे मासे मिळणे कठीण झाले असून परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी समुद्रातील वातावरण शांत होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.


दुसरीकडे, 'ऑल गोवा पर्स सीनर्स बोट ओनर्स असोसिएशन'चे अध्यक्ष हर्षद धोंड यांनी मात्र या समस्येचे मूळ कामगारांच्या टंचाईत असल्याचे सांगितले. त्यांच्या दाव्यानुसार, पणजी आणि इतर मुख्य जेटींवरून अवघ्या ५ टक्के बोटी समुद्रात उतरल्या आहेत. झारखंड, ओडिशा आणि उत्तराखंड या राज्यांतील परप्रांतीय कामगार त्यांच्या मूळ गावी मान्सून लांबल्याने शेतीकामात अडकले आहेत. हे कामगार अद्याप गोव्यात परत न आल्यामुळे बहुतांश ट्रॉलर किनाऱ्यावरच उभे आहेत. कामगारा अभावी मासेमारीच बंद असल्याने बाजारात मासळी पोहोचत नाही, असे धोंड यांचे म्हणणे आहे.


Top Fish Markets in Seraulim - Best Seafood Market - Justdial


गोव्याचा मासेमारी व्यवसाय हा मुळातच सागरी पर्यावरण आणि परप्रांतीय कामगार या दोन्ही घटकांवर अवलंबून आहे. जोस फिलिप डिसोझा यांनी हर्षद धोंड यांच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित करताना म्हटले की, जर केवळ ५ टक्केच बोटी समुद्रात गेल्या असतील, तर त्या मोजक्या बोटींना तरी सुरमईचा मोठा साठा मिळायला हवा होता; मात्र प्रत्यक्षात तसे झालेले नाही. यावरून समुद्रातील प्रतिकूल हवामान आणि खवळलेल्या लाटांचा माशांच्या उपलब्धतेवर थेट परिणाम झाल्याचे स्पष्ट होते.


या संपूर्ण विवादात आणखी एक गंभीर आणि पर्यावरणीय दृष्टीने चिंताजनक मुद्दा मच्छीमार फ्रान्सिस्को फर्नांडिस (पेले) यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी या तुटवड्यासाठी थेट बेकायदेशीर 'एलईडी मासेमारी'ला (LED Fishing) जबाबदार धरले आहे. मोठ्या ट्रॉलर्सद्वारे रात्रीच्या वेळी दिव्यांचा तीव्र प्रकाश वापरून केली जाणारी एलईडी मासेमारी समुद्रातील माशांची अंडी आणि लहान मासे नष्ट करत आहे. यामुळे सुरमईसारख्या मौल्यवान माशांची पैदास धोक्यात आली असून सागरी जैविक साखळी कोलमडली आहे. मत्स्य व्यवसाय खाते (Fisheries Department) आणि ट्रॉलर लॉबी यांच्यातील साठगाठीमुळे या बेकायदेशीर मासेमारीवर कडक कारवाई होत नाही, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.


State seeks Coast Guard's help to curb illegal fishing by LED lights |  Mumbai news


म्हापसा फिश वेंडर्स असोसिएशनच्या अध्यक्षा शशिकला गोवेकर यांनीही बाजारात मासळीची आवक अत्यंत कमी झाल्याचे सांगत विक्रेत्यांची अडचण मांडली आहे. सध्या तरी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर परप्रांतीय कामगार परतल्यानंतर आणि समुद्रातील हवामान स्थिर झाल्यानंतरच परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, हवामान बदल आणि बेकायदेशीर मासेमारी यांसारख्या गंभीर आव्हानांकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर गोव्याच्या समुद्रातील सुरमईचे अस्तित्व कायमचे धोक्यात येण्याचा धोका तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा
सर्व पहा