मडगाव : दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पावसाळ्याच्या दिवसांत रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असली, तरीही एकाही रुग्णाला उपचाराविना माघारी पाठवले जात नाही. इस्पितळ पूर्ण क्षमतेने कार्यरत असून खाटा भरलेल्या असल्या तरी तातडीचे उपचार पुरवले जात आहेत, अशी माहिती इस्पितळाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र बोरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. पावसाळी वातावरण आणि सतत होणाऱ्या हवामान बदलामुळे साथीचे आजार पसरत असून रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.
इस्पितळात सध्या ५०० खाटा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. ओपीडी आणि दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता दरदिवशी सुमारे दीड हजाराहून अधिक रुग्णांची तपासणी केली जात आहे. काही वेळेस खाटा पूर्ण भरल्यामुळे नव्याने येणाऱ्या रुग्णांना सुरुवातीला व्हीलचेअर किंवा ट्रॉलीवर ठेवून प्राथमिक उपचार दिले जातात. मात्र, दुपारपर्यंत आधीच्या रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर लगेचच या रुग्णांना खाटा उपलब्ध करून दिल्या जातात, असे डॉ. बोरकर यांनी स्पष्ट केले. हीच परिस्थिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयातही (जीएमसी) पाहायला मिळत असली, तरी दोन्ही ठिकाणी आरोग्य यंत्रणा रुग्णांना सेवा देण्यासाठी तत्पर आहे.
डेंग्यूच्या रुग्णांविषयी भाष्य करताना त्यांनी सांगितले की, डेंग्यूच्या रुग्णांची संख्या रोज हळूहळू वाढत असली तरी ती चिंताजनक पातळीवर पोहोचलेली नाही. हे रुग्ण एकाच ठराविक भागातील नसून वेगवेगळ्या परिसरातील असल्याने आरोग्य केंद्रांमार्फत उपाययोजना राबवताना काही आव्हाने येत आहेत. हवामानातील बदलांमुळे डासांची उत्पत्ती वाढत असून त्यातून साथीचे आजार पसरत आहेत. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केवळ आरोग्य खात्यावर अवलंबून न राहता नागरिकांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे.
आपल्या घराच्या परिसरात पाणी साचू न देणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे ही नागरिकांचीही सामूहिक जबाबदारी आहे. ताप किंवा साथीच्या आजारांची लक्षणे दिसताच लोकांनी तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी यावे. जनतेचा दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या सेवेवर आणि कार्यक्षमतेवर असलेला विश्वासच वाढत्या रुग्णसंख्येतून दिसून येतो, असे सांगत डॉ. बोरकर यांनी साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जनतेच्या सक्रिय सहकार्याचे आवाहन केले.


