भाजप कार्यालयाची निर्मिती स्वकष्टातून : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

भाजपा कार्यकर्त्यांनी स्वकष्टातून उभारलेल्या नवीन कार्यालयात धार्मिक विधी पार पडले. यावरून काँग्रेसवर टीका करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजप आणि मगोप युतीचे जागावाटप नोव्हेंबरपर्यंत होणार असल्याचे स्पष्ट केले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
15 mins ago
भाजप कार्यालयाची निर्मिती स्वकष्टातून : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी : भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या परिश्रमातून आणि विविध पारदर्शक मार्गांनी निधी संकलित करून पक्षाच्या नवीन कार्यालयाची उभारणी केली आहे. ज्या काँग्रेस पक्षाला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही आणि देशही चालवता आला नाही, त्यांना भाजपवर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, अशा कडक शब्दांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काँग्रेसचा समाचार घेतला. काँग्रेसने भाजपच्या नवीन इमारतीला 'चंदा चोरी भवन' म्हणून हिणवल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे प्रतिपादन केले. आम्ही पक्षाच्या माध्यमातून केवळ राजकारण न करता देशसेवा करत आहोत आणि देश घडवण्याचे कार्य अविरतपणे करत आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.

कदंब पठारावर उभारण्यात आलेल्या या भव्य भाजप भवनाचे अधिकृत उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार असले, तरी गुरुवारी या वास्तूत धार्मिक विधी आणि वास्तू शांतीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांच्या यजमानपदाखाली हा धार्मिक विधी संपन्न झाला. या प्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या हस्ते भाजपचा अधिकृत ध्वज फडकवण्यात आला. हे नवीन भवन म्हणजे गोव्यातील हजारो निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या त्यागाचे आणि परिश्रमाचे फळ असून, पक्षाच्या पुढील राजकीय प्रवासात ते एका दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करेल, असा विश्वास दामू नाईक यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आमदार मायकल लोबो, केदार नाईक, माजी आमदार प्रवीण झांट्ये यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते आणि आमदार आवर्जून उपस्थित होते.

या सोहळ्यादरम्यान माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी नवीन कार्यालयाला भेट दिली. या वेळी भावना व्यक्त करताना, अनेक वर्षांनंतर पुन्हा आपल्या स्वतःच्या घरात आल्यासारखा आनंद होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. पार्सेकर यांनी पक्षाच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, त्यांच्या आगमनाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दामू नाईक म्हणाले.

दुसऱ्या बाजूला, सत्ताधारी युतीतील महत्त्वाचा घटक असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (मगो) अध्यक्ष दीपक ढवळीकर, वीजमंत्री सुदिन ढवळीकर आणि आमदार जीत आरोलकर यांनीही या नवीन कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान पत्रकारांशी बोलताना वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. भाजप आणि मगोप युतीमधील जागावाटपाचा फॉर्म्युला तसेच दोन्ही पक्षांचे उमेदवार येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत निश्चित केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा
सर्व पहा