काँग्रेसच्या 'त्या' सोशल मीडिया पोस्टमुळे फातोर्डातील युतीवर प्रश्नचिन्ह

फातोर्डा काँग्रेस गट कमिटीच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाच्या युतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
55 mins ago
काँग्रेसच्या 'त्या' सोशल मीडिया पोस्टमुळे फातोर्डातील युतीवर प्रश्नचिन्ह

मडगाव : फातोर्डा काँग्रेस गट कमिटीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका संदेशामुळे काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्ष यांच्यातील राजकीय युतीबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. "फातोर्ड्यात एकच वाट, काँग्रेसचा हात" असा संदेश देत, फातोर्डा मतदारसंघाचे गमावलेले वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन या पोस्टद्वारे करण्यात आले आहे. या पोस्टचे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षात २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत अधिकृत युती असल्याचे मानले जात असताना, फातोर्डा काँग्रेस कमिटीच्या या भूमिकेमुळे स्थानिक समीकरणांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या पोस्टमध्ये करण्यात आलेल्या 'गतवैभव' या उल्लेखाचा रोख अप्रत्यक्षपणे फातोर्डाचे विद्यमान आमदार तथा गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्याकडेच असल्याचे बोलले जात आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस जिल्हा समितीचे सदस्य मेलविन फर्नांडिस यांनी पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस पक्षाचे संघटनात्मक काम आणि आगामी निवडणुकीची तयारी सातत्याने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. गोवा फॉरवर्ड पक्ष हा सध्या युतीतील महत्त्वाचा भागीदार आहे. मात्र, विजय सरदेसाई एकीकडे युती कायम असल्याचे सांगत असताना दुसरीकडे युतीबाबतची चर्चा स्थगित केल्याचे जाहीर करत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये स्वाभाविकपणे प्रश्न उपस्थित होत असल्याचे फर्नांडिस यांनी नमूद केले.

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या राजकीय भूमिकेचा विचार करून विजय सरदेसाई यांनी युतीची चर्चा स्थगित केली आहे का, असा सवालही फर्नांडिस यांनी उपस्थित केला. दरम्यान, काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून संघटनात्मक बांधणी आणि प्रचार कार्य सुरू ठेवण्याच्या स्पष्ट सूचना मिळाल्या आहेत. त्यानुसार फातोर्डा गट काँग्रेस समिती आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सक्रिय झाली असून, मतदारांशी थेट संपर्क वाढवण्यावर भर दिला जात आहे. या नवीन घडामोडींमुळे फातोर्डा मतदारसंघातील काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाच्या युतीचे भवितव्य काय असेल, याविषयी राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा
सर्व पहा