पोलिसांशी वाद; पाच संशयितांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

सांगे पोलीस ठाण्यात गोंधळ : सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळ्याचा आरोप

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
4 hours ago
पोलिसांशी वाद; पाच संशयितांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

मडगाव : सांगे पोलीस ठाण्यात गोंधळ घालणे, पोलिसांशी वाद घालणे तसेच घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या पाच संशयितांचा अटकपूर्व जामीन दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. संशयित मेश्यू डिकॉस्टा, दत्ताराम राऊत देसाई, विराज नागेकर, प्रितानंद कुर्डीकर आणि सूरज बाळ्ळीकर यांच्या जामीन अर्जांवर एकत्रित सुनावणी घेण्यात आली.
सांगे पोलिसांनी गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते मेश्यू डिकॉस्टा, दत्ताराम राऊत देसाई, अॅड. विराज नागेकर आणि इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील गंभीर व अजामीनपात्र कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे. पोलीस उपनिरीक्षक कृष्णदीप बोरकर यांच्याशी वाद घालणे तसेच सांगे येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात बेकायदेशीर प्रवेश करून सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
या प्रकरणात संशयितांनी अटक टाळण्यासाठी १४ ऑगस्ट रोजी दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुधीर शिरगावकर यांनी पाचही संशयितांना पुढील सुनावणीपर्यंत (१७ ऑगस्ट) अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.
१३ ऑगस्ट रोजी सांगे पोलिसांनी सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव करणे, सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणणे आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला होता.
सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी संशयितांच्या अटकपूर्व जामिनाला जोरदार विरोध केला. या प्रकरणातील सर्व संशयितांची सखोल चौकशी आवश्यक असून त्यासाठी त्यांची पोलीस कोठडी गरजेची असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.
न्यायालयाने घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अशा प्रकारच्या कृत्यामुळे पोलिसांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो आणि समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो, असे निरीक्षण नोंदवले. अशा घटनांमुळे इतरांनाही पोलिसांशी गैरवर्तन करण्यास प्रोत्साहन मिळण्याची शक्यता असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
पोलिसांच्या अधिकाराला आव्हान देणे घातक
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पोलिसांच्या अधिकाराला अशा प्रकारे आव्हान देणे समाजासाठी घातक ठरू शकते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यानंतर पाचही संशयितांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आले. पुढील तपास सांगे पोलीस करत आहेत.      

हेही वाचा
सर्व पहा