पणजी : दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने (एसीबी) हणजूण-कायसुव पंचायतीच्या तिघा पंचांच्या विरोधात १ लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणात मेरशी येथील सत्र न्यायालयात ९३६ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात ५० साक्षीदारांची साक्ष नमूद करण्यात आली आहे.
वॉटर बुटीक गेस्ट हाऊस (बागा बीच, बार्देश) येथील रहिवासी समर मर्चंट यांनी २५ जून २०२० रोजी एसीबीकडे या प्रकरणी तक्रार केली होती. एसीबीचे तत्कालीन निरीक्षक नीलेश शिरोडकर यांनी प्राथमिक चौकशी केली. त्यात पंच सदस्य हनुमंत गोवेकर, सुरेंद्र गोवेकर आणि शीतल दाभोळकर या तिघांनी संगनमत करून तक्रारदाराकडून लाचेची मागणी केल्याचे उघड झाले. त्यानुसार, भ्रष्टाचार विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास तत्कालीन उपअधीक्षक सुचेता देसाई यांच्याकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर
एसीबीने सापळा रचून हनुमंत गोवेकर याला १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते. हनुमंत आणि त्याचा साथीदार सुरेंद्र गोवेकर यांना ताब्यात घेण्यात आले होते, तर शीतल दाभोळकर यांना न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाला होता.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक मेलीटो फर्नांडिस यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यांनी तपास पूर्ण करून संशयित पंच सदस्य हनुमंत गोवेकर, सुरेंद्र गोवेकर आणि शीतल दाभोळकर या तिघांविरोधात मेरशी येथील सत्र न्यायालयात ५० साक्षीदारांची साक्ष असलेले ९३६ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.


