मडगाव : दवर्ली येथे घडलेल्या बहुचर्चित सादिक बेल्लारी हत्याप्रकरणातील संशयित तौसिफ कदेमणी व खादर खान खानजादे यांनी दाखल केलेले जामीन अर्ज दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावले आहेत.
बचाव पक्षाचा युक्तिवाद
मायना-कुडतरी पोलिसांनी संशयितांना २ सप्टेंबर २०२३ रोजी हत्या आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या गुन्ह्याखाली अटक केली होती. संशयित मागील दोन वर्षे, १० महिने आणि २४ दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत असल्याने त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. खटल्याची सुनावणी संथ गतीने सुरू असून, अजून पहिल्या साक्षीदाराची उलटतपासणीही पूर्ण झालेली नाही, त्यामुळे संशयितांच्या दीर्घ कोठडीचा विचार करून त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. तसेच, संशयित खादर खान याने तुरुंगात आपल्या जीवाला धोका असल्याचा दावाही अर्जात केला होता.
सरकारी पक्षाचा विरोध
सरकारी वकिलांनी या जामीन अर्जांना तीव्र विरोध दर्शवला. तक्रारदार व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबानुसार, घटनेच्या दिवशी तौसिफ कदेमणी आणि खादर खान खानजादे हे दोघे स्कूटरवरून सादिक बेल्लारीच्या घराजवळ आले होते. त्यांच्याकडे दोन कोयते होते. संशयितांनी सादिकच्या घरात घुसून त्याच्यावर कोयत्याने प्राणघातक वार केले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. गुन्ह्याचे गांभीर्य आणि मृतदेहावरील जखमांचे स्वरूप पाहता हा पूर्वनियोजित कट होता, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
सार्वजनिक सुरक्षा आणि साक्षीदारांना धमकावण्याचा धोका लक्षात घेणे आवश्यक आहे. खटल्याची सुनावणी सुरू झाली असून सरकारी पक्षाला १७ साक्षीदार तपासायचे आहेत, त्यामुळे हा खटला वेगाने चालवला जाऊ शकतो, असेही सरकारी पक्षाने स्पष्ट केले.
न्यायालयाचा निर्णय
हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये जन्मठेपेची किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते; त्यामुळे अशा गुन्ह्यांत अडीच ते तीन वर्षांचा कालावधी हा 'दीर्घ तुरुंगवास' मानला जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. संशयितांविरोधात सबळ पुरावे उपलब्ध असल्याने न्यायालयाने दोन्ही संशयितांचे जामीन अर्ज फेटाळून लावले आणि प्रकरण पूर्णपणे निकाली निघेपर्यंत त्यांना कोठडीतच ठेवण्याचे निर्देश दिले.


