पणजी : राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर बनवण्यासाठी कदंब महामंडळाकडून (KTC) ठोस पावले उचलली जात आहेत. महामंडळाच्या ताफ्यात लवकरच टप्प्याटप्प्याने नवीन व आधुनिक बसेसचा समावेश करण्यात येणार असून, प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा पुरवण्यावर विशेष भर दिला जात आहे. या नियोजनानुसार ताफ्यात २५ नव्या मिनी बसेससह सेमी-लक्झरी आणि लक्झरी गाड्यांचा समावेश केला जाणार आहे. विशेषतः कोल्हापूरसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गांवर प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, यादृष्टीने नवीन वाहने उपलब्ध करून दिली जातील.
याशिवाय, १५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी पूर्ण केलेल्या जुन्या बसेस टप्प्याटप्प्याने स्क्रॅप करून त्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या नवीन गाड्या रस्त्यावर उतरवण्याचे काम वेगाने सुरू आहे. अशी माहिती कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी दिली. आज १० कदंब बसेस प्रवाशांच्या सेवेत रुजू करण्यात आल्या. या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
केवळ बसेसची संख्या वाढवण्यावर न थांबता राज्यातील मुख्य बसस्थानकांचा कायापालट करण्यावरही महामंडळाने लक्ष केंद्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर वास्को आणि मडगाव येथील बसस्थानकांचे अत्याधुनिक (Ultra-Modern) संकुलात रूपांतर करण्याचे नियोजित आहे. विशेषतः वास्को बसस्थानकाचा विकास 'सार्वजनिक-खासगी भागीदारी' (PPP) तत्त्वावर केला जाणार असून, या महत्त्वाकांक्षी प्रस्तावावर येत्या दोन महिन्यांत अंतिम निर्णय अपेक्षित आहे. महामंडळाचे मध्यवर्ती कार्यालय आणि परिसर पीपीपी मॉडेलअंतर्गत विकसित करून केटीसीला अधिक फायदेशीर आणि स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय राज्यातील इतर बसस्थानकांची दुरुस्ती आणि देखभाल अधिक प्रभावीपणे करून प्रवाशांना चांगल्या सुविधा दिल्या जातील, अशी माहिती केटीसीचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी दिली.
दरम्यान, केटीसीच्या प्रशासकीय सुधारणांसोबतच नावेली मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर बोलताना आमदार उल्हास तुयेकर यांनी भाजपच्या मजबूत स्थितीचा पुनरुच्चार केला. नावेली मतदारसंघात भाजपला मिळालेला विजय हा एका दिवसात किंवा सहजासहजी मिळालेला नाही. जिल्हा पंचायत निवडणुकीपासून या क्षेत्रात पक्षाचे स्थान भक्कम करण्यासाठी भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अथक मेहनत, त्याग आणि योगदान दिले आहे. लोकशाहीत कोणालाही निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्यामुळे विरोधकांकडून किंवा नव्याने तयार होणाऱ्या उमेदवारांकडून मिळणाऱ्या आव्हानाची भीती बाळगण्याचे अजिबात कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात सातत्याने राबवण्यात आलेली विकासकामे आणि थेट जनतेशी ठेवलेला संपर्क हीच आपली खरी ताकद आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासह संपूर्ण पक्षश्रेष्ठींचा आपल्या पाठीशी पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी आणि जनतेच्या विश्वासाच्या बळावर आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाची उमेदवारी (तिकीट) १०० टक्के आपल्यालाच मिळेल आणि नावेली मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपचाच विजय होईल, असा ठाम विश्वास आमदार उल्हास तुयेकर यांनी व्यक्त केला.


