गुलबर्गा : कौटुंबिक वादातून एकाने सासरच्या घरी जाऊन स्वतःच्या कमरेला जिलेटिनच्या कांड्या बांधून घडवून आणलेल्या भीषण आत्मघाती स्फोटात संशयित पतीसह त्याच्या १५ वर्षांच्या निष्पाप मुलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर पाच जण गंभीर जखमी झाले. कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील अलंद तालुक्यातील मटकी-तांडा येथे ही थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे. पुण्यात दगड खाणीत काम करणाऱ्या शिवलाल राठोड या ४९ वर्षीय व्यक्तीने हे भयंकर कृत्य केले असून, या घटनेमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मूळचा गुलबर्गा येथील व सध्या पुण्यात वास्तव्यास असलेला शिवलाल राठोड याचा त्याची पत्नी सविता हिच्याशी गेल्या काही काळापासून सतत कौटुंबिक वाद सुरू होता. या वादाला व त्रासाला कंटाळून सविता ही १५ वर्षांची मुलगी वीरा आणि १९ वर्षांचा मुलगा प्रकाश यांना सोबत घेऊन कर्नाटकातील मटकी तांडा येथील आपल्या माहेरी निघून गेली होती. पत्नी आणि मुले घर सोडून गेल्याचा राग मनात धरून शिवलाल मंगळवारी सकाळी थेट सासुरवाडीत धडकला. पुण्यात दगड खाणीत कामाला असल्याने शिवलालला स्फोटकांची तांत्रिक माहिती आणि त्यांचा वापर करण्याचे पूर्ण ज्ञान होते. सासरच्या घरात पोहोचताच त्याने पत्नी व नातेवाईकांशी तीव्र वादावादी सुरू केली. घरातील मंडळींना काही समजण्याच्या आतच त्याने घराचा दरवाजा आतून बंद करून घेतला. त्या वेळी घरात त्याची पत्नी, मुलगी, मुलगा आणि काही जवळचे नातेवाईक उपस्थित होते.
शिवलालने कसलाही विचार न करता कमरेला बांधलेल्या अत्यंत शक्तिशाली जिलेटिनच्या कांड्यांचा 'स्विच' दाबला. क्षणात संपूर्ण घर हादरवणारा भीषण महास्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की शिवलालच्या शरीराच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या, तर त्याच्या शेजारीच बसलेली त्याची मुलगी वीरा हिचाही जागीच करूण अंत झाला. या महास्फोटाने शेजारच्या काही घरांनाही मोठे तडे गेले असून परिसरात प्रचंड घबराट पसरली. या घटनेत सविता राठोड, मुलगा प्रकाश, नातेवाईक सुरेखा चव्हाण, विवेक चव्हाण आणि नितेश हे पाच जण गंभीररीत्या भाजले आणि जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मृतदेहांचे अवशेष ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. प्राथमिक तपासात शिवलालने पुण्यातील दगड खाणीतून जिलेटिनच्या कांड्या चोरून कर्नाटकात आणल्याचा पोलिसांना संशय आहे. पुण्यातील खाणीतून एवढी घातक स्फोटक सामग्री बाहेर कशी आली आणि ती राज्याची सीमा पार करून कशी नेली गेली, याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत.


