पाच वर्षांत आमदारांच्या उपचारांवर १.४६ कोटी खर्च

विद्यमान आमदारांसाठी सरकार वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना राबवते. या योजनेअंतर्गत आमदारांचा वैद्यकीय खर्च सरकारच्या तिजोरीतून केला जातो. २०२२ मध्ये निवडून आलेल्या सात आमदारांनी गेल्या पाच वर्षांत या योजनेचा लाभ घेतला आहे.

Story: समीप नार्वेकर |
5 hours ago
पाच वर्षांत आमदारांच्या उपचारांवर १.४६ कोटी खर्च

गोवन वार्ता
पणजी : गेल्या पाच वर्षांत गोव्यातील सात आमदारांच्या वैद्यकीय उपचारांवर सरकारने १.४६ कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांच्या वैद्यकीय उपचारांवरच सरकारी तिजोरीतून १ कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च झाली आहे, अशी आकडेवारी गोवा विधिमंडळ सचिवालयाने दै. ‘गोवन वार्ता’ला दिली आहे.
विद्यमान आमदारांसाठी सरकार वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना राबवते. या योजनेअंतर्गत आमदारांचा वैद्यकीय खर्च सरकारच्या तिजोरीतून केला जातो. २०२२ मध्ये निवडून आलेल्या सात आमदारांनी गेल्या पाच वर्षांत या योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी सहा वेळा, सभापती गणेश गावकर यांनी चार वेळा, आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर यांनी तीन वेळा, तर साळगावचे आमदार केदार नाईक, सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत आणि डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी प्रत्येकी एकदा या योजनेचा लाभ घेतला आहे.
सरकारने या योजनेवर केलेल्या १.४६ कोटी रुपयांपैकी १.३३ कोटी रुपये, म्हणजेच सुमारे ९१ टक्के निधी नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांच्या उपचारांवर खर्च झाला आहे. २०२३ मध्ये त्यांच्यावर ३.७४ लाख रुपये, २०२५ मध्ये ८२.६२ लाख रुपये, तर २०२६ मध्ये ४७.१५ लाख रुपये खर्च झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर मंत्री रमेश तवडकर आहेत. त्यांच्या वैद्यकीय उपचारांवर २०२३ मध्ये ६८,२९८ रुपये, २०२५ मध्ये ३.२० लाख रुपये आणि २०२६ मध्ये ९३ हजार रुपये, असे एकूण ४.८१ लाख खर्च झाले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर सभापती गणेश गावकर असून त्यांच्या उपचारांवर २०२३ मध्ये १.०४ लाख रुपये, २०२४ मध्ये ९४,०२० रुपये, २०२५ मध्ये ६०,६४३ रुपये आणि २०२६ मध्ये ८४,२२० रुपये, असे एकूण ३.४३ लाख रुपये खर्च झाले आहेत.

हेही वाचा
सर्व पहा