पर्वरी उड्डाणपुलाचे १० सप्टेंबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
पर्वरी उड्डाणपुलाचे १० सप्टेंबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन

पणजी: पर्वरी येथील सहापदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम पूर्ण झाले असून, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते येत्या १० सप्टेंबर रोजी या पुलाचे उद्घाटन होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांनी ही माहिती दिली. या उड्डाणपुलामुळे म्हापसा ते पणजी मार्गावर दररोज होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीतून वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार असून, हा प्रवास आता अवघ्या काही मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे.

सहा पदरी आणि सुमारे साडेपाच किलोमीटर लांबीच्या या एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू करण्यात आले. 'आरआरएसएम इन्फ्रा' कंपनीतर्फे ४५० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. या मार्गावरील सततच्या वाहतूक बदलांमुळे आणि तांत्रिक आव्हानांमुळे कामाच्या गतीत काही प्रमाणात विलंब झाला तरीही, केवळ दोन वर्षांच्या कालावधीत हा भव्य प्रकल्प पूर्ण करण्यात यश आले आहे. गणेश चतुर्थीपूर्वी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी दिले होते. या आश्वासनानुसार चतुर्थीच्या दोन दिवस आधीच हा पूल जनतेच्या सेवेत दाखल होत आहे.

या उद्घाटनाची तारीख निश्चित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि खासदार सदानंद शेट तानावडे उपस्थित होते. या बैठकीत सर्व तांत्रिक बाबींचा आढावा घेऊन १० सप्टेंबर ही उद्घाटनाची तारीख अंतिम करण्यात आली. हा उड्डाणपूल सुरू झाल्यामुळे उत्तर गोव्यातून राजधानी पणजीच्या दिशेने येणाऱ्या आणि जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांचा व वाहनधारकांचा दैनंदिन प्रवास अत्यंत सोपा आणि जलद होणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा