पणजी : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भक्कम युती करणे ही काळाची गरज असल्याचे मत काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केले आहे. परवा मडगाव येथे पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत भाजपला पराभूत करण्यासाठी इच्छुक असलेल्या विरोधी पक्षांशी चर्चा प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसने नुकत्याच स्थापन केलेल्या सात सदस्यीय विशेष समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. यात समविचारी पक्षांशी युती आणि इतर मुद्यावर चर्चा झाली होती.
टाळी वाजवण्यासाठी दोन्ही हातांची गरज
दरम्यान काल या मुद्द्यावर बोलताना गिरीश चोडणकर यांनी सांगितले की, सर्व विरोधी पक्षांनी आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून एका मंचावर यावे, ही काळाची मागणी आहे. जे पक्ष सत्ताधाऱ्यांच्या धोरणांविरोधात आहेत, त्यांनी एकत्र येऊन लढा दिल्यास भाजपचा पराभव शक्य आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी युतीची बोलणी करण्यासाठी अत्यंत वेळेत ही विशेष समिती गठीत केली असून, अशी पुढाकार घेणारी समिती स्थापन करणारा काँग्रेस हा पहिलाच पक्ष ठरला आहे. टाळी वाजवण्यासाठी दोन्ही हातांची गरज असते; त्यामुळे काँग्रेसने संवादाचे हात पुढे केले असून इतर विरोधी पक्षांनीही याला सकारात्मक प्रतिसाद देणे गरजेचे आहे. सध्या प्रत्येक पक्ष आपापल्या पातळीवर सर्व ४० मतदारसंघांत संघटन बळकट करत आहे, ही एक स्वाभाविक राजकीय प्रक्रिया असली तरी मुख्य ध्येय हे भाजपविरोधी भक्कम आघाडी उभारणे हेच असावे, यावर त्यांनी भर दिला.
घाईगडबडीचा निर्णय घेणार नाही : सरदेसाई
दुसऱ्या बाजूला, काँग्रेसच्या या युतीच्या आवाहनावर गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेससोबतची चर्चा सध्या स्थगित ठेवण्यात आली असून त्या निर्णयात कोणताही बदल झालेला नाही, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले. आपण स्वतःहून कोणताही घाईगडबडीचा निर्णय घेणार नसून, गोव्याच्या जनतेच्या आणि राज्याच्या हिताचा विचार करूनच पुढील रणनीती ठरवली जाईल. तसेच, विरोधी ऐक्याच्या प्रक्रियेत घाई न केल्यामुळे आपल्याला 'भाजपचे एजंट' किंवा 'दलाल' म्हणून हिणवणाऱ्या राजकीय विश्लेषकांवर त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली.
आरजी सकारात्मक
दरम्यान, काँग्रेसच्या या विरोधी युतीच्या प्रस्तावाला 'रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीने' सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. गोव्याचे हित, गोमंतकीय जनतेची अस्मिता, संस्कृती आणि पर्यावरणाचे रक्षण या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून अर्थपूर्ण व सकारात्मक चर्चा करण्यासाठी आपण पूर्णपणे तयार असल्याचे आरजीपीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे गोव्याच्या राजकीय पटावर विरोधी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांत आरजीपीची ही भूमिका एका नव्या राजकीय समीकरणाची नांदी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


